ठाणे : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (Live In Relationship) राहणाऱ्या तरुणीची गळा दाबून हत्या (Murder) केल्यानंतर रुग्णवाहिकेमधून (Ambulance) तिचा मृतदेह गुपचूप गावी विजापूरला (Vijapur) नेण्याचा आरोपीचा प्रयत्न फसला आहे. भिवंडी पोलिसांनी (Bhiwandi Police) पुणे पोलिसांच्या (Pune Police) मदतीने आरोपीला ताब्यात घेत अटक केली. तसेच, रुग्णवाहिकेमधून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. घरात झालेल्या वादानंतर या तरुणीची हत्या झाल्याची माहिती चौकशीमध्ये निष्पन्न झाली.
भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी एका महिलेचा फोन आल्यानंतर, २४ वर्षाच्या तरुणीच्या हत्येचा प्रकार उजेडात आला. या तरुणीचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती तिचा मृतदेह गाडीतून घेऊन निघाल्याची माहिती फोनद्वारे पोलिसांना माहिती मिळाली. शहानिशा करण्यासाठी पोलीस भिवंडीतील शास्त्रीनगरमध्ये पोहचले. चौकशीमध्ये ही माहिती खरी निघाली. पोलिसांनी आणखी माहिती घेतली असता, तरुणीचा मृतदेह कपड्यामध्ये गुंडाळून रुग्णवाहिकेमधून गावी नेण्यात येत असल्याचे समजले. सोबत आरोपी आणि त्याच्या दोन बहिणी असल्याची बाब स्पष्ट झाली.
पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिकेचा मालक, चालकाचा आणि आरोपीचा मोबाइल नंबर मिळवला. रुग्णवाहिकेचे लोकेशन तपासल्यानंतर, ही रुग्णवाहिका पुणे शहरातून जात असल्याचे आढळले. भिवंडी पोलिसांनी पुणे पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर, त्यांनी ही रुग्णवाहिका नवले पुलाजवळ अडवली आणि तरुणीच्या मृतदेहासह रुग्णवाहिकेचा चालक, आरोपी आणि त्याच्या बहिणींना ताब्यात घेतले.
पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर, तरुणीचा मृत्यू गळा दाबून झाल्याची बाब स्पष्ट झाली. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता, या तरुणीच्या हत्येचा उलगडा झाला. तरुणी आणि आरोपी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गुरुवारी पहाटे त्यांच्यात वाद झाल्याने आरोपीने तरुणीची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह तरुणीच्या गावी नेण्यात येत होता.