मोक्काच्या गुन्ह्यातील 'वाँटेड' आरोपी अखेर अटकेत; खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई
पुणे : वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील मोक्काच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. संबंधित आरोपी हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. अखेर खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत त्याला अटक केली.
वैभव शांताराम उकरे (वय २६, रा, कर्वेनगर, वडार वस्ती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात बी एन एस १११, ३१०(२), ११८(१), ११५(२) व मोक्कानुसार गुन्हा नोंद आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजेश माळेगावे तसेच बालारफी शेख, राजेंद्र लांडगे व त्यांच्या पथकाने केली आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime News: भीक मागण्यासाठी पुण्यातून दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण; तुळजापूर येथून टोळीला अटक
वैभव उकरे याच्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. गुन्ह्याच्या तपासात वैभव व त्याच्या साथीदार यांच्याकडून टोळी निर्माण करून गुन्हे केले जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार, पोलिसांनी या टोळीवर मोक्का कारवाई केली होती.
गुन्ह्यानंतर वैभव झाला होता पसार
या गुन्ह्यानंतर वैभव उकरे पसार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. परंतु, तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. यादरम्यान, खंडणी विरोधी पथकाचे बाला रफी शेख यांना वैभव याच्याबाबत माहिती मिळाली. या माहितीवरून राजेंद्र लांडगे यांनी तांत्रिक विश्लेषण काढत त्याला जेरबंद केले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याला पुढील कारवाईसाठी वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : आधी बलात्कार,नंतर बळजबरीने गर्भपात केल्याचा आरोप; पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तासह तिघांवर गुन्हा दाखल