विजेच्या तीव्र धक्क्याने मायलेकाचा मृत्यू; लाकडावर लावलेली तार तुटून पडली अन्...
साकोली : साकोली तालुक्यातील मालूटोला येथे शेतशिवारात लावलेल्या सौरकुंपण तारेच्या माध्यमातून विजेचा तीव्र धक्का बसला. या धक्क्याने मायलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी (दि. ५) घडली. यात एका गुराचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त असून, शोककळा पसरली आहे.
महानंदा प्रभुदास इलमकर (वय ५०) व सुशील प्रभुदास इलमकर (वय ३०) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी सोलारवर आधारित हलका विद्युत प्रवाह असलेली तार शेतशिवाराभोवती लावलेली होती. मात्र, अचानक आलेल्या वादळ-वाऱ्यामुळे मुख्य विद्युतवाहक तार तुटून सोलर तारेवर पडली आणि उच्चदाबाचा करंट प्रवाहित झाला. त्यामुळे ही दुर्घटना घडली.
हेदेखील वाचा : दरवाजा किंवा बॅगला हात लावताच तुम्हाला लागतोय जोरदार करंट! जाणून घ्या काय आहे यामागचं कारण, 99 टक्के लोकांना माहिती नाही
रविवारी दुपारीच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे लाकडाच्या बल्लीवर टांगलेली तार तुटून खाली पडली. शेतात असलेल्या गोराला वीजतारेच्या धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. गोरा निपचीत पडलेला पाहून त्याला काय झाले? हे बघण्यासाठी महानंदा इलमकर शेतात गेल्या. त्यांनाही सोलर तारेतून आलेल्या वीजप्रवाहाचा झटका बसला आणि त्यांचाही मृत्यू झाला. आईचा आवाज ऐकून सुशीलनेही धाव घेतली. सुशील यालासुद्धा जबर धक्का बसून काही क्षणांत त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
गावकऱ्यांची घटनास्थळी धाव
दुपारी शेतात गेलेले मायलेक घरी परतले नाहीत. हे लक्षात आल्यावर प्रभुदास इलमकर सायंकाळीच्या सुमारास शेतात गेले. तिथे त्यांना विदारक दृश्य पाहून धक्का बसला. मायलेक आणि गोरा मृत अवस्थेत पडलेले होते. त्यांनी तत्काळ गावात ही माहिती दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.