bjp MP hema malini Controversial statement on Maha Kumbh Mela stampede
नवी दिल्ली : संसदेमध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मात्र नेत्यांमध्ये अर्थसंकल्पापेक्षा महाकुंभमेळ्यावर जास्त चर्चा होत आहे. महाकुंभमेळ्यातील व्यवस्थापेवरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तर सत्ताधारी नेते व्यवस्थापनावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करत आहेत. दरम्यान, भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवर वादग्रस्त विधान केले आहे.
महाकुंभमेळ्याबाबत देशासह जगभरातून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 144 वर्षांनी भरणाऱ्या या महाकुंभ मेळ्यामध्ये कोट्यवधी नागा साधू आणि भाविक सामील झाले आहेत. मात्र मौनी अमावस्येच्या रात्री महाकुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेच्या बाबत सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये किमान ३० जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ६० जण जखमी झाले होते. मात्र ही घटना जास्त मोठी नव्हती. याची अतिशयोक्ती केली जात आहे, असे विधान भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केले आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.
काय म्हणाल्या हेमा मालिनी?
संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधताना भाजप खासदार हेमा मालिनी म्हणाल्या की, “आम्ही महाकुंभमेळ्याला गेलो होतो, आम्ही खूप छान पद्धतीने स्नान घेतले. एक घटना घडली हे बरोबर आहे, पण ती फार मोठी घटना नव्हती. ती किती मोठी होती हे मला माहित नाही. त्याची आता अतिशयोक्ती केली जात आहे. इतके लोक येत आहेत, त्यांचे व्यवस्थापन करणे खूप कठीण आहे परंतु आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत,” असे भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी म्हटले आहे. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संसदेमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या पारदर्शकपणे समोर मांडावी याबाबत आक्रमक भूमिका घेतली. अखिलेश यादव म्हणाले की, “महाकुंभमेळ्याच्या व्यवस्थेबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे आणि तेथील विविध लष्कराकडे सोपवली पाहिजे. सरकारने मृतांची संख्या, जखमींवर उपचार आणि कार्यक्रमासाठी केलेल्या व्यवस्थेची अचूक आकडेवारी सादर करवाी अशी विनंती केली आहे,” त्यामुळे संसदेमध्ये झालेल्या चर्चेमुळे हेमा मालिनी यांनी बाहेर येऊन वक्तव्य केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत जाणून घ्या अपडेट
महाकुंभमेळ्यातील व्यवस्थापेवरुन अभिनेत्री व सपा खासदार जया बच्चन यांनी देखील सरकारला धारेवर धरले आहे. जया बच्चन म्हणाल्या की, “सध्या सर्वांत जास्त दूषित पाणी कुठे आहे? तर कुंभमेळ्यात…चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले आहेत. यामुळे नदीचं पाणी दूषित झालं आहे. खऱ्या मुद्द्यांवर कोणीच बोलत नाही. कुंभमेळ्याला जाणाऱ्या सर्वसामान्य लोकांना कोणत्याही विशेष सुविधा पुरवल्या जात नाहीत. त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्ता नाही. पण व्हीआयपी लोकांसाठी सर्व सुविधा आहेत. कोट्यवधी लोक तिथे आल्याचा खोटा दावा केला जातोय. इतक्या मोठ्या संख्येने लोक तिथे कसे जमू शकतात?” असा सवाल जया बच्चन यांनी उपस्थित केला होता.