Shambhuraj Desai's application filed for Assembly candidature from Patan
पाटण : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांमध्ये उमेदवारांमध्ये लगबग सुरु आहे. पाटण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल (दि. 28) रोजी सहाव्या दिवशी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोपान टोम्पे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत गुरव यांनी दिली आहे. जिल्ह्यात अतिशय संवेदनशील व चुरशीची लढत होणाऱ्या पाटण मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होत असल्याने या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. येथील प्रत्येक उमेदवार आपल्या विजयाची खात्री देताना दिसत आहेत.
महाविकास आघाडीतून बंडखोरी करत सत्यजितसिंह पाटणकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीमधून शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम व महायुतीमधून शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी साध्या पध्दतीने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सोमवारी येथील प्रांत कार्यालयात महाविकास आघाडीतून बंडखोरी करत सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी निवास अण्णा पाटील, राजाभाऊ शेलार, यशस्विनी सत्यजितसिंह पाटणकर, सुनंदा जाधव, हणमंतराव अवघडे आदी उपस्थित होते. शिवसेनेतून शिंदे गटातून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ३ व शंभूराज देसाई यांच्या पत्नी स्मितादेवी देसाई यांनी २ अर्ज दाखल केले. त्यांच्यासोबत रविराज देसाई, यशराज देसाई, जयवंतराव शेलार, बशीर खोंदू, भागूजी शेळके आदी उपस्थित होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटातून भानुप्रताप उर्फ हर्षद कदम यांनी एक अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत नितीन बानुगडे पाटील, काँग्रेसचे नरेश देसाई, सुरेश पाटील आदी उपस्थित होते. याशिवाय संतोष रघुनाथ यादव व प्रताप किसन मस्कर यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दोन्ही युतींना विजयाचा विश्वास
विजयाचा विश्वास व्यक्त करत शंभूराज देसाई म्हणाले की,”आज पाटण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेली अडीच वर्षे विकासाचे खूप मोठे काम महाराष्ट्रात झाले आहे. त्या कामाची पोहोचपावती निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून जनता देईल. पाटण मतदारसंघात गेल्या ५ वर्षात जवळपास २ हजार ९२० कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण केली आहेत. या विकासकामांकडे पाहून महायुतीचा उमेदवार म्हणून माझा चांगल्या मतांनी विजय होईल. निवडणुकीला सामोरे जाताना कधीही विरोधकांना कमी लेखायचे नसते. ते त्यांनी केलेली कामे जनतेपुढे नेतील, आम्ही आमची कामे जनतेला सांगू,” असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे हर्षद कदम यांनी अर्ज दाखल केल्यानंतर ते म्हणाले, “पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील वरिष्ठ सर्वच नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवून पाटण विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा डौलाने फडकेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत अपक्ष अर्ज दाखल केला. ते म्हणाले, “महाविकास आघाडी एकसंघ राहावी म्हणून वरिष्ठ पातळीवरील आमचे सर्व नेते प्रयत्न करत आहेत. त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. येणाऱ्या 4 तारखेपर्यंत बऱ्याच घडामोडी घडतील. महाविकास आघाडी एकसंघ राहील, अशी अपेक्षा आम्ही करतो,” असे मत पाटणकर यांनी व्यक्त केले.
सांगली पॅटर्नचा विषयच येत नाही
शिवसेना उबाठा गटाचे नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही. पाटण विधानसभा मतदारसंघापुरता हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांसह आमचे घटक पक्ष यांचे अधिकृत उमेदवार म्हणून हर्षद कदम यांनी आज अर्ज भरला आहे. आता ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे यातून मार्ग निघेल. येथे शरद पवार यांची खेळी अथवा सांगली पॅटर्नचा विषयच येत नाही. मुळातच ही जागा ठाकरे गटाची आहे. या जागेवर दुसऱ्या कोणाचा क्लेम असणे अपेक्षितच नाही. आम्हाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर हा प्रश्न सोडविलाच पाहिजे. आमच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचविल्या असून निश्चितच यातून योग्य मार्ग निघेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : भाजपची मोठी खेळी ! आता ‘या’ पक्षाच्या थेट प्रदेशाध्यक्षाचाच करून घेणार पक्षप्रवेश
देसाई-पाटणकर यांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा!
अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर हे उमेदवारी अर्ज भरून बाहेर पडत असतानाच समोरून शंभूराज देसाई दालनात आले. दोघेही समोरासमोर आल्यावर दोघांनीही स्मितहास्य करत हातात हात देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यामुळे कार्यकत्यांमध्ये चर्चा रंगली होती.
मंगळवार, दि. २९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोपान टोम्पे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत गुरव यांनी दिली.