File Photo : Ajit Pawar
बारामती : लोकसभा निवडणुकीमध्ये जी चूक मी केली, ती चूक तुम्ही करायची नव्हती, असे सांगत माझ्या विरोधात साहेबांनी उमेदवार दिल्याचे म्हणतात. मग पवार साहेबांनी तात्यासाहेबांचे (अनंत पवारांचे) घर फोडले का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अश्रू अनावर झाले.
हेदेखील वाचा : Yugendra Pawar Baramati Politics: युगेंद्र पवारांना कोणता कानमंत्र द्याल? शरद पवार म्हणाले, गेली 57 वर्षे….
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कण्हेरी या ठिकाणी झालेल्या जाहीरसभेत बोलताना अजित पवार भावनाविवश झाले. यावेळी अजित पवार म्हणाले, ‘माझी आई सांगत होती की, माझ्या दादाच्या विरोधात फॉर्म भरू नका. तरीदेखील ऐकलं नाही. या पद्धतीने जे काय चाललंय ते बरोबर नाही. मोठ्या व्यक्तींनी पण त्यामध्ये सांगायला पाहिजे होतं. मी जीवाला जीव देणारा माणूस आहे. मी लोकसभेत सुनेत्रा पवार यांना उभे करून मी चुकलो; आता कोण चुकले ते सांगा’.
तसेच घरातलं भांडण चव्हाट्यावर यायला नको होतं, असे सांगत असताना अजित पवार यांना अश्रू अनावर झाले. पहिला फॉर्म मी भरला, ती चूक तुम्ही करायला नको होती. फॉर्म कोणी भरायला सांगितला तर साहेबांनी सांगितला, असे सांगतात. मग साहेबांनी तात्यासाहेबांचं (अनंत पवार यांचे) घर फोडलं का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. आम्ही बिकट परिस्थितीतून चांगली परिस्थिती निर्माण केली. यामध्ये माझ्या आईने आम्हाला आधार दिला, असे सांगत अजित पवार भावनाविवश झाले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. काही महिला कार्यकर्त्यांनी अजित दादा तुम्ही रडायचं नाही, तर लढायचं, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा घोषणा यावेळी दिल्या. या निवडणुकीमध्ये आपण कोणावरही टीका करणार नसल्याचे अजित पवार यांनी पुन्हा सांगितले. कार्यकर्त्यांनी देखील लोकसभेवेळी आपले काम न केलेल्यांना नाराज करू नये, असे आवाहन केले.
हेदेखील वाचा : गुहागरमधून मनसेचे प्रमोद गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल! भास्कर जाधव, राजेश बेंडल यांच्याशी होणार लढत