amit thackeray on eknath shinde Shiv Sena rebellion
ठाणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार आहे. यामध्ये आता मनसे आणि तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काही युवा नेते देखील रिंगणात उतरले आहेत. यामध्ये बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार तर माहिमचे उमेदवार अमित ठाकरे यांची जोरदार चर्चा रंगली आहे. पहिल्याच विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या या नेत्यांच्या सभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता अमित ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करत आपले मत मांडले आहे.
काय म्हणाले अमित ठाकरे?
माहिम विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपली भूमिका मांडली. यावेळी अमित ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी पक्षाचं चिन्हआणि नाव घेतलं, ते चुकीचं केलं. नागरिक म्हणून पाहताना ते मला चुकीचं वाटतंय. पक्षचिन्ह आणि पक्षनाव बाळासाहेबांचं आहे, ते त्यांचंच राहायला पाहिजे होतं. लोकांच्या विश्वासाने त्यांनी हे निर्माण केलं होतं.” असे मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
बंडखोरीच नंतरची ही पहिलीच विधानसभा
राज्यामध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली. राज्यामध्ये महाविकास आघाडी निर्माण होऊन सत्ता स्थापन झाली. मात्र नंतर शिवसेनेमध्ये मोठे बंड झाले. 2021 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारुन राजकारणामध्ये नवा ट्वीस्ट आणला. उद्धव ठाकरे यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं. यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री हे तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्षाची लढाई गेली. विधानसभेमध्ये देखील राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे नाव व पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदेंना दिले. या प्रकारेमुळे राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले. उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नवीन नाव व चिन्ह घ्यावे लागले. त्यानंतर वर्षभरानंतर अजित पवार यांच्या बंडामुळे शरद पवार यांच्या पक्षाला देखील याच प्रकाराला सामोरे जावे लागले. अजित पवार यांनी बंड पुकारल्यामुळे अजित पवार यांना शरद पवार यांच्या पक्षाचे नाव व चिन्ह दिले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणूक ही बंडखोरीनंतर पहिली असल्यामुळे जोरदार रंगत येणार आहे.