मतदानापूर्वीच शरद पवारांना धक्का
इंदापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतशा राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार रविवारी इंदापूर दौऱ्यावर होते. मात्र, त्यांचा दौरा आटोपताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला या मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे नाराज नेते अप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असून, ते अजित पवार गटात प्रवेश करणार आहे.
इंदापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी (अजित पवार) चे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवरून जगदाळेंनी नाराजी व्यक्त केली होती. जनतेसमोर खोटे बोलणाऱ्या व्यक्तीला साथ देणार नाही, असे जगदाळे म्हणाले होते. त्यानंतर रविवारी त्यांनी भरणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये नाराज असलेले इंदापुरातील पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळेंनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे.
जगदाळे अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात ते दत्तात्रय भरणे यांचा प्रचारही करणार आहेत. जनतेसमोर खोटे बोलणाऱ्या व्यक्तीला साथ देणार नसल्याचे सांगत त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. जगदाळे यांच्या या भूमिकेमुळे इंदापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.