' हे 150 लोग आपला देश चालवतात...', दिल्लीच्या प्रचार सभेत राहुल गांधीनी सांगूनचं टाकलं
नांदेड : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले असल्यामुळे प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडाला आहे. दिल्लीचे अनेक नेते महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी सभा घेत आहे. आता कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नांदेडमध्ये सभा घेतली. या सभेमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुतीवर टीकास्त्र डागले. तसेच पुन्हा एकदा संविधानाची प्रत मिरवणून राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केले.
काय म्हणाले राहुल गांधी?
महायुतीच्या नेत्यांनी राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये कोरे कागद असलेले संविधान वाटले असल्याचा गंभीर आरोप केला. पंतप्रधान मोदींनी देखील याबाबत पुण्यातील सभेमध्ये उल्लेख केला. यावरुन राहुल गांधींनी टीका केली. नांदेडच्या सभेमध्ये राहुल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदी म्हणतात की हे संविधान रिकामे आहे. यामध्ये काहीही नाही, असा मोदींचा दावा आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, हे संविधान रिकामं नाही. यामध्ये हजारो वर्षांच्या इतिहास, विचार, सर्वांच्या विचारधारा भरलेल्या आहेत. संविधानामध्ये हिंदुस्थानची आत्मा आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला रिकामं म्हणता तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा आणि महात्मा गांधी या सर्वांचा अपमान करता,” असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.
पुढे राहुल गांधी म्हणाले की, “खरी लढाई ही संविधान वाचवण्याची आहे. संविधानामध्ये आदिवासी असा शब्द आहे. आदिवासी हे नाव दिलेलं आहे. संविधानांमध्ये कधीही वनवासी म्हटलं जात नाही. वनवासी शब्दाचा उल्लेख संविधानांमध्ये नाहीच. पण आरएसएसचे आणि भाजपचे लोक आणि देशाचे पंतप्रधान हे तुम्हाला वनवासी म्हणतात. आदिवासी व वनवासी शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. आदिवासी म्हणजे जे देशाचे पहिले निवासी व मालक आहेत. तर हे वनवासी म्हणतात, त्याचा अर्थ तुम्ही वनातमध्ये राहता असा अर्थ होतो. ते तुमच्या कडून अधिकार काढून घेत आहेत. पण या जमिनीच्या अधिकारासाठी इंडिया आघाडीने लढा दिला आहे,” असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी धारावीवरुन देखील महायुतीवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदी यांनी 16 लाख करोड रुपये अरबपतींचा कर्ज माफ केले. तसेच धारावीसाठी 1 लाख करोड रुपये घेऊन अदानींना धारावीची जमीन महायुती व मोदी सरकारने दिली. पण मागासवर्गीय, आदिवासी, शेतकरी, मजुरांना आणि महिलांना काय दिले? त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की, जेवढा पैसे हे अरबपतींचा माफ करणार तेवढा आम्ही सामान्य लोकांचा करणार. महालक्ष्मी योजना देणार यामध्ये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये देणार आहे. पहिल्या महिन्याच्या एक तारखेला सकाळी सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. महिलांसाठी बस प्रवास मोफत असणार आहे. शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांचे कर्ज माफ केले जाईल,” असे वचन राहुल गांधी यांनी नांदेडच्या सभांमधून केले आहे.