सुनील केदार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; रामटेक मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा उघडपणे प्रचार (फोटो सौजन्य-X)
महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीचा जोरात प्रचार सुरु आहे.अशातच रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी रिंगणात उतरवण्याच्या निर्णयावर माजी आमदार सुनील केदार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशीष जयस्वाल यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, ठाकरे यांच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच काँग्रेसने बंडखोरी करत उमेदवार दिल्याचा दावा केदार यांनी केला आहे.
तर दुसरीकडे रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीत उघड फूट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मविआत रामटेकची जागा ठाकरेंना मिळाल्याने, याठिकाणी ठाकरेंनी विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली. मात्र या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक लढण्याच इच्छुक होते.यानंतर त्यांच्या उमेदवारी विरोधात राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली. काँग्रेसने राजेंद्र मुळक यांना पक्षातून निलंबित केले असले तरी रामटेकच्या प्रचारसभेत उघडपणे काँग्रेस नेते मुळक यांच्या पाठीशी असल्याचं चित्र समोर आले आहे.
हे सुद्धा वाचा: ठाकरे गटाला धक्का; मोहल्यातील नागरिकांचा आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
विशेषतः मुळक यांना सुनील केदार यांची साथ होती. त्यामुळे बरबटे यांची उमेदवारी जाहीर होताच केदार यांनी तातडीने मातोश्री गाठत ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या उमेदवारीविरोधात मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बरबटे यांची उमेदवारी कायम राहिल्याने अखेर मुळक यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
या सर्व प्रकराणानंतर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते सुनिल केदार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. केदार यांनी मुळक यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली. त्यातच ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी जाहीर प्रचार सभेत केदार यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे वक्तव्य जाहीर सभेत केले. सतत होत असलेल्या टीकेनंतर केदार यांनी प्रथमच यावर भाष्य केले आहे. त्यांनी रामटेक मतदारसंघात अपक्ष उमेदवार आणि माजी काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांच्या प्रचारासाठी उघड पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) च्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
रामटेकमधील उद्धव गटाच्या नेत्यांनी केदार यांची वागणूक ‘अप्रामाणिक’ असल्याचे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना केदार म्हणाले, “आमचे ध्येय स्पष्ट आहे. शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी उद्धव ठाकरे यांचा अपमान केला आहे. त्यांना धडा शिकवायचा आहे.” निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी केदार यांनी उद्धव ठाकरेंना भेटून मुळक यांना शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवारी देण्याची विनंती केली होती. मात्र, उद्धव ठाकरे याला तयार नव्हते. त्यामुळे मुळक यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले, “अशा परिस्थितीत महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पडण्याचा धोका आहे. ही बाब टाळायला हवी होती.” दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले, “काँग्रेस पक्ष अधिकृत एमव्हीए उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देत आहे. पक्षविरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्यात येईल.” रामटेकमधील हा वाद महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण करत आहे.
हे सुद्धा वाचा: काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या कारचा अपघात, प्रचाराहून घरी परत असताना…