'उरमोडी, जिहे-कठापूर, टेंभूसाठी अनेकांचे योगदान'; शरद पवार यांचं विधान
दहिवडी : उरमोडी, जिहे-कठापूर, टेंभू या योजनांसाठी माण-खटावमधील अनेकांनी आपल्या आयुष्यातील मोठा कालखंड दिला. कै. सदाशिवराव पोळ, कै. भाऊसाहेब गुदगे, कै. धोंडीराम वाघमारे, कै. वसंतराव माने, कै. वसंतराव कट्टे, कै. वाघोजीराव पोळ आदींनी महत्वाचे योगदान दिले, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : भाजपला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’; माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर साधला निशाणा
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या प्रचारार्थ येथील बाजार पटांगणात आयोजित भव्य सभेत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख, उत्तमराव जानकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, व्यासपीठावरील सर्व नेते एकत्र आहेत हा संदेश इथले प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. ही एकी प्रभाकर घार्गे यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाली, याचा मला आनंद आहे. आज सर्वजण एका विचाराने काम करत आहेत. अशीच एकी पुढे ठेवा, या भागाचे प्रश्न कसे सुटत नाहीत हे आम्ही सर्वजण बघू व तुमच्या पाठीशी उभे राहू. या भागात फक्त एमआयडीसी उभारून थांबून चालणार नाही तर उद्योजक आणून कारखानदारी वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. कारखाने काढले तर हाताला काम मिळेल व या भागाचा चेहरामोहरा बदलेल याची मला खात्री आहे.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, ‘आम्ही माण-खटावमधील अपुऱ्या सिंचन प्रकल्पासाठी निधी आणून मार्गी लावू. या ठिकाणी स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका सुरु करु. इथून पुढे उरमोडी असो वा जिहे-कठापूर या योजनांचे पाणी जनतेच्या मागणीनुसार सुटेल याची ग्वाही मी देतो. प्रशासनाला माझं सांगणं आहे, लोकशाहीचा उत्सव लोकशाही मार्गाने होवू द्या. पोलिसांच्या माध्यमातून दहशत माजवली जाते हे चालणार नाही’.
प्रभाकर घार्गे म्हणाले, ‘जातीपातीत भांडणं लावून माण-खटावचं वाटोळं करण्याचं काम विरोधकांनी केलं. विकासाला अडवणारी ही घातक प्रवृत्ती आपल्याला थांबवावी लागणार आहे. आम्ही सर्वजण मिळून माण-खटावचा सर्वांगीण विकास करणार आहोत. आम्ही कोणाच्याही वाटेला जात नाही. मात्र, माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे’.
प्रभाकर देशमुख म्हणाले, शरद पवारांवर टीका करण्याची त्यांची औकात तरी आहे का? जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर बाकड्यावर बसण्याची औकात त्यांची आहे, अशा शब्दांत त्यांनी जयकुमार गोरेंवर टीका केली. तसेच या निवडणुकीत प्रभाकर घार्गे यांना मताधिक्याने निवडून देऊ, असे आवाहनही केले.
हेदेखील वाचा : यवतमाळमध्ये 1500 हून अधिक विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी ; अनोख्या पद्धतीने दिला मतदानाचा संदेश
पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम जयकुमार गोरेंनी केल्याचा आरोप रणजितसिंह देशमुख यांनी केला. तर अनिल देसाई यांनी विरोधकांच्या सभा नसून बोरीचा बार सुरु आहे, अशी टीका केली.