BJP state president Chandrashekhar Bawankule has been nominated from Kamthi assembly constituency
मुंबई : विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. अवघ्या एका महिन्यावर मतदान आले असून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून पहिले 99 शिलेदार जाहीर करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त विद्यमान उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांमध्ये उत्साहपूर्वक वातावरण असून भाजप महाराष्ट्रचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते कामाला लागले आहेत. पहिल्या यादीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सध्या भाजपचे संघटनात्मक पद आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे कार्यरत आहेत. असे असताना देखील बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कामठी या मतदारसंघातून बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. मागील टर्ममध्ये भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करणारे बावनकुळे हे आता पुन्हा सत्ता आमदार म्हणून कार्यरत होण्याची शक्यता आहे. उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधून आपले मत व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : ब्रेकिंग! भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला मिळाली संधी?
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “भाजपकडून आज 99 उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. यापुढे देखील दोन याद्यांमधून उमेदवार जाहीर करण्यात येतील. हे सर्व उमेदवार 100 टक्के निवडून येतील. महाराष्ट्राची जनता महायुतीला नक्कीच निवडून देईल. जनतेला विकास हवा आहे. आणि महायुतीकडे विकासाचा अजेंडा आहे. विरोधकांकडे फक्त तोंडाच्या वाफा आहेत. पुढचे पाच वर्षे आम्ही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत,” असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे पाच वर्षांनंतर निवडणूक लढवणार असल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “मला कामठी मतदारसंघातील कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर विश्वास आहे. तसेच कामठीमधील मतदारांवर देखील विश्वास आहे. केंद्रीय नेतृत्वाने ही जबाबदारी दिली असल्यामुळे मी नक्कीच ती पार पाडेल. या विधानसभेने 15 वर्षे तीन वेळा मला आमदार केलं आहे. त्यामुळे आता देखील ते माझ्या पाठीशी उभे राहतील,” असा विश्वास कामठीमधून उमेदवारी मिळालेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.