भोर मतदारसंघात तिरंगी नव्हे तर थेट चौरंगी लढत होणार; नक्की कोण होणार आमदार? जनतेला उत्सुकता
भोर/रुपेश जाधव: भोर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे शंकर मांडेकर यांच्यात अटीतटीची लढत होईल,असे वाटत असले तरी महायुतीत बंडखोरी करत रिंगणात उतरलेले शिवसेना (शिंदे)गटाचे कुलदीप कोंडे, भाजपाचे किरण दगडे यामुळे भोर विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत होणार आहे .भोर विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार आहे असे असले तरी मात्र भोर मधील आमदार कोण ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
सदर मतदारसंघात गेल्या निवडणूकीत शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांनी आमदार संग्राम थोपटे यांना चांगलाच शह दिला होता. मात्र किरकोळ मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यामुळे शिवसैनिक या जागेसाठी दावेदार असल्याची कार्यकर्त्यांसह जनसामान्य जनतेत चर्चा होती .मात्र कुलदीप कोंडे यांना डावलले तसेच या मतदारसंघात गेली दोन वर्षे भाजपाचे किरण दगडे यांनी हजारो महिलांना,ज्येष्ठांना काशी, आयोध्या, कोल्हापूर या ठिकाणचे देवदर्शन आयोजन केले .विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करीत भेट वस्तुचे वाटप केले,महिलांना राखी पौर्णिमा, भाऊबीज दिवाळी सणाचे औचित्य साधून साड्या दिवाळी फराळ वाटप केले व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत चांगलाच तगडा जनसंपर्क तयार केला असताना त्यांचा विचार केला गेला नाही.
तर तालुक्यात विविध प्रकारच्या योजना, विकास कामे करुण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असणारे अजित पवार यांचे खंद्दे समर्थक मानले जाणारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना डावलत महायुतीने शिवसेना(उबाठा)चे जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर यांना आयात करुन शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादी (अजित पवार) गटातून उमेदवारी जाहीर केल्याने शिवसैनिकासह राष्ट्रवादी अजित पवार गटातील सर्व सामान्य कार्यकर्ता नाराज झाल्याचे चित्र पहायला मिळते.त्यामुळे बंडखोरीचा पवित्रा घेत शिवसेना (शिंदे) गटाचे कुलदीप कोंडे व भाजपाचे किरण दगडे यांनी निवडणूक आखाड्यात शड्डू ठोकले असल्याने याचा फटका महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना बसणार असल्याचे पारा पारावरील चर्चेत बोलले जात आहे.
ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधून तळागाळापर्यंत पक्षाची उभारणी भक्कमपणे केली. तर कार्यकर्त्यांशी नाळ जुळल्यामुळे खंबीरपणे सत्ता राखण्यासाठी यश मिळवले. त्यामुळे १९९९ चा अपवाद वगळता सहा वेळा मतदारांनी त्यांच्या हाती सत्ता दिली . त्यानंतर पुत्र संग्राम थोपटे यांनी पक्षाची पुनर्बांधणी करुन कार्यकर्त्यांची मोठी फळी व ताकद पक्षामागे उभी केली आहे .त्यामुळे त्यांनी आमदारकीची हॅटट्रिक केली.तालुक्यात केलेली विविध प्रकारची विकास कामे, रस्ते, धरण प्रकल्प बाधीत गावांसाठी मोठ्या प्रमाणात आणलेला निधी, सहकार क्षेत्रातील विविध शिखर संस्थांवर असलेली एकहाती सत्ता, सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ तसेच लोकसभा निवडणुकीत थोपटे व पवार यांच्यामधील राजकीय संघर्ष संपुष्टात आला असल्याने सुप्रिया सुळे यांना तालुक्यातून भरघोस मतदान झाले .यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शरदचंद्र पवार यांची मिळालेली खंबीरसाथ, त्यातच आंबेडकरी चळवळीतून उमेदवारी अर्ज नसल्याने व भोर तालुक्यातील आंबेडकरी जनतेसाठी उभारलेल्या दिक्षाभूमिमुळे बौद्ध मतदारांचा एक गठ्ठा मतदान संग्राम थोपटे यांच्या गोटात जाणार असल्याने यांच्यासाठी यावेळी ही मोठी जमेची बाजू ठरणार आहे.
भोर राजगड (वेल्हे) मुळशी मधून मागील विधान सभा निवडणूकीत शिवसेना पक्षातून उमेदवार असलेले कुलदीप कोंडे यांना चांगलेच मतदान झाले होते त्यांनी आमदार संग्राम थोपटे यांना चांगलाच शह दिला होता. मात्र किरकोळ मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. असे असले तरी पक्ष फुटीनंतर ऐन लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी चा घटक म्हणुन शिवसेना (उबाठा) चा प्रचार, प्रसार करत असतानाच अचानक महायुतीचा घटक असले ल्या सत्ताधारी शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश केल्याने शिवसैनिकात नाराजी व्यक्त केली गेली त्यातच शिंदे गटातून उमेदवारी न मिळाल्याने पुरारलेले बंड यामुळे अपक्ष लढण्याचा घेतलेला निर्णय त्यांना खरच तारणार का ? मतदार साथ देणार का? असे देखील बोलले जात आहे.
त्यातच महायुतीच्या घटक, मित्र पक्ष, संघटनाच्या प्रमूख कार्यकर्त्यांनी अनेक बैठका घेतल्या व ठाम निर्णय घेतला कि वरिष्ठ पातळीवरून जो उमेदवार देतील त्याचे प्रामाणिकपणे काम करायचे असे पत्रकार परीषद घेत जाहीरही केले, मात्र ऐनवेळी उमेदवार म्हणुन आपला विचार न केल्याने किरण दगडे व कुलदीप कोंडे यांनी बंड पुकारले व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला; मात्र त्यावेळी त्यांच्या सोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते खरंच महायुतीने दिलेल्या उमेदवाराचे काम करणार का? की सोबत असताना एकमेकांना सहकार्य करणार म्हणून मित्र झालेल्या अपक्ष रिंगणात उतरलेले उमेदवार किरण दगडे व कुलदीप कोंडे यांना साथ देणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.