

मंगळवेढा : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. उद्या (दि.20) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यामध्ये 288 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. तर येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्याचे राजकारण ढवळून निघाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून देखील जय्यत तयारी केली जात आहे.
पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. हे सर्वच उमेदवार आमदारकीचे स्वप्न आजमावत आहेत. बुधवार दि.२० राेजी मतदान हाेत असल्याने यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे.मंगळवेढ्यात 10 गावे संवेदनशील असून यावर पाेलीस प्रशासन करडी नजर ठेऊन आहे. दरम्यान पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघातील एकूण 5 लाख 70 हजार 935 महिला व पुरुष मतदार लाेकप्रतिनीधींचे भवितव्य मतदान मशिनमध्ये बंद करणार आहेत.
पंढरपुर-मंगळवेढा मतदार संघात मंगळवेढ्यात 189 मतदान केंद्र स्थापन केली आहेत. मंगळवेढ्यात 83 गावे असून यामध्ये 1 लाख 97 हजार,251 इतके मतदार आहेत. त्या पैकी 95 हजार 331 महिला मतदार तर 1 लाख 19 हजार 15 इतके पुरुष मतदार आहेत. तसेच पंढरपुरमधील 27 गावांचा समावेश येथे करन्यात आला असून येथील मतदार संख्या 3 लाख 73 हजार 684 इतकी आहे.उद्या मतदान होत असून निवडणूक रिंगणात पंढरपूर -मंगळवेढा विधानसभेसाठी जवळपास 24 उमेदवार आमदारकीचे स्वप्न पाहत असल्याने मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याचा निर्णय होणार आहे.
अधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी
येथील दहा गावे संवेदनशील असून मतदान दिवशी येथे पोलिसांची फिरती पथके राहणार आहेत. दरम्यान मुढवी, बोराळे ,लक्ष्मीदहीवडी, मरवडे, निंबोणी, मारापुर, पाटखळ, नंदेश्वर ,लोणार,गाेणेवाडी आदी संवेदनशील गावांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. विधानसभेसाठी मतदान साहित्य ने - आण करण्यासाठी मंगळा आगाराच्या 55 पैकी 52 बसेस पाठवण्यात आले असून केवळ आगारात तीन बसेस शिल्लक राहिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील व शहरी भागातील फेऱ्या पूर्णतः बंद झाल्याने प्रवाशांचे हाल सुरू असून प्रवाशांना इतर प्रायव्हेट प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. मंगळवेढ्यातील 189 बुथवर मतदान मशिन व साहित्य घेऊन कर्मचारी सायंकाळी 4 नंतर हजर झाले असून मतदान केंद्र परिसरात प्रतिबंद क्षेत्राची आखनी करण्यात कर्मचारी व्यस्त आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी चाेख पोलीस बंदोबस्त नेमला आहे. मंगळवेढामध्ये सुरक्षित व निर्भरतेने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे.