Manoj Jarange
अंतरवली : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते रिंगणामध्ये उतरले आहेत. त्याचबरोबर तिसरी आघाडी देखील निर्माण झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे मत देखील महत्त्वाचे ठरणार आहे. मराठा समाजाशी संवाद साधून उमेदवार निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला होता. आता जरांगे पाटील यांनी मुस्लीम समाजाशी चर्चा करुन निवडणुकीमध्ये उमेदवार पाडण्याचे ठरवले आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज (दि.31) मुस्लिम आणि बौद्ध धर्माच्या धर्मगुरुंसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले आहे. येत्या 3 नोव्हेंबर रोजी ते कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे आणि कोणाला पाडायचे हे सांगणार आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीबाबत सस्पेंन्स ठेवला आहे. त्यामुळे आता मुस्लीम, दलित आणि मराठा समाज एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
हे देखील वाचा : घरी परत आल्यानंतर बदलले आमदारांचे सूर; श्रीनिवास वनगांनी मांडली भूमिका
काय म्हणाले जरांगे पाटील?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लीम समाजाच्या धर्मगुरुंची चर्चा केली आहे. तसेच बौद्ध धर्मीय गुरुंची देखील चर्चा केली आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधून जरांगे पाटील म्हणाले की, आज बौद्ध आणि मुस्लीम धर्मगुरूंसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये समीकरण जुळलं आहे. मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्र आले आहेत. आता बंजारा आणि ओबीसी समाजासोबत देखील चर्चा करणार आहे. आम्ही लोकशाही मार्गानं निवडणूक लढवणार आहोत. कोणाची दादागिरी, गुंडगिरी चालू देणार नाही. आता गुलामगिरीमध्ये आयुष्य जगायचं नाही, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : महायुतीचं सरकार येणार, काळ्या दगडावरची रेघ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा, मुस्लीम व दलित समीकरण जुळलं आहे, त्यानंतर आता कोणत्या मतदारसंघात कोणाला उभं करायचं, कोण-कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवायची? याबाबतचा निर्णय येत्या तीन नोव्हेंबरला घेऊ. आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आहेत. त्यांना जेव्हा सांगितलं जाईल की फॉर्म काढायचा तेव्हा त्यांनी फॉर्म काढला पाहिजे. तेव्हा फॉर्म ठेवायचा नाही. एक नाव सांगेल त्याचा फॉर्म ठेवायाचा बाकीच्यांनी त्यांच्या खांद्यावर गुलाल टाकायचा” असे थेट मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे निवडणुकांना समोरे जाताना जरांगे पाटील हे अजून वाटाघाटी करत असून येत्या 3 नोव्हेंबरला ते अंतिम निर्णय घेणार आहेत.