महायुतीचं सरकार येणार, काळ्या दगडावरची रेघ; देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य (फोटो सौजन्य-X)
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करतानाच मुंबई महापालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. या तयारीची झलक ऐन दिवाळीत दिसली. मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते आणि प्रदीर्घ काळ पालिका काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा यांनी काँग्रेसमधील सर्व प्रमुख पदांचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे. याचदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीचं सरकार येणार, काळ्या दगडावरची रेघ असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. क्षेत्रिय अस्मितेला भाजपचं समर्थन राहिलं आहे. पण त्यासोबत राष्ट्रीय अस्मिता आहे. त्याचा स्वीकार व्हावा. ही राष्ट्रीय अस्मिता म्हणजे हिंदुत्व आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्व स्वीकारलं आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्यासोबत बोलणी सुरु आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच राज्यातील जनतेच्या मनात विश्वास होत आहे. महायुतीचं सरकार येणार आहे. लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे. नामांकन पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी आमचे क्रॉस फॉर्म आले होते. त्याबाबत शिंदे यांच्या घरी बैठक झाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा: मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का! रवी राजा भाजपमध्ये जाणार
रवी राजा यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात येत असून त्यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. लवकरच ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मला नाव विचारू नका, पण येत्या काही दिवसांत काँग्रेसचे नेते आमच्यासोबत येतील.
रवी राजा हे सायनमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र पक्षाने संधी नाकारल्यामुळेच रवी राजा यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. रवी राजा हे मुंबई काँग्रेसमधील मोठे नेते होते. काँग्रेसने सायन (शिव) मधून गणेश यादव यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते रवी राजा नाराज झाले. रवी राजा हे सायनमधून (शीव) पाचवेळा नगरसेवक राहिले आहेत. तर पाच वर्षे त्यांनी मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले आहे.
काँग्रेसचे माजी नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच रवी राजा यांची मुंबई भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार यांनी सांगितले.
रवी राजा यांच्यासारखा मातब्बर नेता, ज्यांनी पालिका गाजवली, मावळत्या महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. आक्रमक भूमिका मांडणारे नेते, पाच टर्म नगरपालिका निवडून आले. एक विक्रम त्यांच्या नावावर आहे, त्यांनी 23 वर्षे बेस्टचे सदस्य म्हणून काम केले. बेस्ट संदर्भात पालिकेत रवी राजा यांच्याकडे ऑथेरिटी म्हणून बघितलं जातं. जनसंपर्क असलेला नेता. काँग्रेस नेत्यांशी त्यांचा कनेक्ट आहे. आम्हाला रवी राजा यांचा फायदा होईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
हे सुद्धा वाचा: “मी शपथ घेतो की मी देशाची एकता…,” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी केवडियात, एकतेची दिली शपथ
रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला होईल. त्यांच्या माध्यमातून अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. भविष्यात त्यांच्या संपर्कातून काँग्रेसचे दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करतील. पुढच्या काळात काँग्रेसचे प्रमुख लोक त्यांच्या संपर्कातून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ही नावे आज विचारू नका. प्रवेश होईल तेव्हाच सांगेल. पालिकेत आणि मुंबई शहरात ज्यांनी काँग्रेस टिकवून ठेवली त्यापैकी रवी राजा आहे. रवी राजा यांचं कार्यक्षेत्र मोठं आहे. सायनमध्ये त्यांचं काम मोठं आहे. त्यामुळे आमचे उमेदवार तमिल सेल्वन यांना फायदाच होणार आहे, असं देवेंद्र फडणवीस या पत्रकार परिषदेत म्हणाले.