manoj jarange patil told whom to vote and whom to not
बीड: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. यंदाची विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमुख लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे. मात्र यावेळी मराठा आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. मागील दीड वर्षापासून जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. मात्र निवडणुकीमधून त्यांनी माघार घेतली आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी कोणाला पाडायचे याबाबत वक्तव्य केले आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाजाला निवडणुकीबाबत आवाहन केले आहे. यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर आता जरांगे पाटील यांनी कोणाला पाडायचे याबाबत वक्तव्य केले. ‘मी सरळ सांगतो तुम्हाला लिहून घेणे किचकट वाटले तर, सरळ ज्याला पाडावे वाटले तर पाडून टाका. ज्याने आरक्षणाला विरोध केला त्या सर्वांना पाडून टाका,’ असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “आम्हाला म्हणतात आमचे सरकार आल्यावर दाखवू. उभ्या रांगा धरून रपा रपा पाडा. लिहून घेण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही अडचणीत येऊ नका. लोकसभेला सांगितले होते आणि आता पण सांगत आहे. पाडा पाडी करा. आता गरिबाला किंमत आली आहे, चपला सगट पाय पडत आहेत. मराठा आंदोलनाला गोरगरीब मराठा आणि ओबीसी मधील छोट्या छोट्या जातीला किंमत आली. ज्याने आरक्षणाला विरोध केला त्याला पाडा. ऊर्जा मंत्री गेलेला आहे आणि त्याला मराठ्यांनी कचका दाखवला आहे. मला नाही वाटत तुम्हाला सांगायची गरज आहे. शिवरायांच्या काळात संकेतिक भाषा होती. आता ही पाडायचं कसं माहित आहे. भुजबळ यांना माहीत आहे जेलात कसे जायचे… कोणाला पाडायचे याबद्दल आता संभ्रमात राहू नका. आज प्रत्येक क्षेत्रातील मराठ्याला वाटते आरक्षणशिवाय पर्याय नाही. आपण निवडणूक न लढवायची योग्य वेळी योग्य भूमिका घेतली,” असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : “बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करण्याचं धाडस आहे का?” पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला आव्हान
पुढे जरांगे पाटील यांनी मराठा उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. जरांगे पाटील म्हणाले की, “आपण सर्व जाती धर्माचा सन्मान केला पाहिजे. मराठा समाजाला वाटले तर उमेदवाराकडून लिहून घ्या व्हीडीओ करा. मी राज्यातील सर्व उमेदवार यांना ओळखत नाही. गावातील माणसाला वाटते कोण निवडून येणार आहे, त्याला निवडून द्या. नाही समजलं तर पाडून टाका. माझा हा राजकीय दौरा नाही, हा सामाजिक दौरा आहे. आपण आपल्या आंदोलनाची तयारी करू. आपल्याला सामूहिक उपोषण करायचं आहे,” असे सूचक विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.