मालमत्तेवरून सुषमा अंधारेंची बालाजी किणीकरांवर टीका (फोटो - सोशल मीडिया)
अंबरनाथ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते जोरदार तयारीला लागले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे. तर येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही युतींच्या नेत्यांमध्ये वादंग निर्माण झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे यांची अंबरनाथमध्ये प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली.
अंबरनाथमध्ये महाविकास आघाडीकडून राजेश वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी सभेमधून महायुती व खास करुन शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. शिंदे गटाचे विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यावर टीका केली. आमदार बालाजी किणीकर यांच्याकडील करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीवरुन सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले कुठून? ते नेमके कुठे कष्ट करायला गेले होते? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : “बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करण्याचं धाडस आहे का?” पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला आव्हान
अंबरनाथच्या सभेमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, “बालाजी किणीकर तुम्ही असा कोणता अल्लाउद्दीनचा दिवा घासला आणि कुठे इतकी मेहनत केली की ज्यामुळे तुमच्याकडे इतके पैसे आले? या चाळीसच्या चाळीस गद्दारांकडे पैसे आले, पण सर्वसामान्यांचा खिसा कापला गेला,” अशा शब्दांत जहरी टीका सुषमा अंधारे यांनी केली. त्यांच्या या टीकनंतर शिंदे गटाचे नेते व उमेदवार बालाजी किणीकर यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
हे देखील वाचा : ‘जयंत पाटलांनी गलिच्छ राजकारण केलं’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा घणाघात
माध्यमांनी या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर बालाजी किणीकर म्हणाले की, “सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप खोटे आहेत. मी डेंटिस्ट आहे, माझे दोन दवाखाने होते. माझी पत्नीही डेंटिस्ट असून मी शिवसैनिक म्हणून काम करत होतो. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला उमेदवारी दिली. गेली 15 वर्ष या शहराचं मी प्रतिनिधित्व करतोय. मी माझ्या ऍफिडेव्हिटमध्ये माझे व्यवसाय काय आहेत, याची माहितीही दिली आहे. मी खोटे ऍफिडेव्हिट देणारा माणूस नाहीताईंनी ते बघावं आणि मग माझ्यावर टीका करावी. ताई मोठ्या नेत्या आहेत,” असे प्रत्युत्तर डॉ. बालाजी किणीकर यांनी दिले आहे.