MNS Raj Thackeray targeted Uddhav Thackeray and Rahul Gandhi in last election sabha
काळाचौकी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा दिवस आहे. प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक असताना मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली आहे. काळाचौकी परिसरामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शिलेदारासाठी सभा घेतली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीतील या शेवटच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी महायुती व महाविकास आघाडी दोघांवर जोरदार निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील शेवटची सभा ही काळाचौकी येथे बाळा नांदगावकर यांच्यासाठी घेतली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, शेवटची प्रचारसभा बाळा नांदगावकर यांच्यासाठी घ्यायची ही त्यांची इच्छा होती. या सभेच्या निमित्ताने मी अनेकांची दिलगिरी आणि धन्यवाद व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न खोळबलेले आणि लोंबकळलेले आहेत. मी महाराष्ट्र दौरा केला. तेव्हा मी पाहिलं की अत्यंत वाईट परिस्थिती ही महाराष्ट्राची आहे. गावातील मुलं मुंबई पुण्यात जायचा विचार करतात तर शहरातील मुलं परदेश जाण्याचा विचार करत आहेत, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे राज ठाकरे म्हणाले की, “राज्यामध्ये अनेक विषय आहेत. पण हे प्रश्न सुटले नसल्यामुळे या लोकांनी निवड़णुकीमध्ये मतदारांचे लक्ष वेगळीकडे वळवलं आहे. हिंदुत्वाने भारावलेल्या महाराष्ट्रामध्ये जातींजातींमध्ये भांडणं लावण्याचं काम शरद पवार यांनी केलं. आता यातून तरी महाराष्ट्र बाहेर आला पाहिजे. राज्यात आहे ते सगळे पक्ष मेले तरी चालतील पण मंहाराष्ट्र जगला पाहिजे. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जे राजकारण चालतं ते महाराष्ट्रामध्ये होऊ नये. अत्यंत भीषण परिस्थिती सध्या आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जन्मानंतर या सर्व गोष्टी सुरु झाल्या. संताची शिकवण, एकोपा हे यांच्या स्वार्थी राजकारणासाठी सगळं विसरुन चाललो आहे. त्यांना स्वार्थाशिवाय काहीही दिसत नाही, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
हा मतांचा अपमान नाही का?
पुढे राज ठाकरे म्हणाले की, “मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडण्यासाठी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याबरोबर जाऊन हे नेते बसले. मतदारांना काहीही सांगितलं नाही अन् विचारलं नाही. हा मतदारांच्या मताचा अपमान नाही का? स्वार्थासाठी एकत्र बसतात हे कोणतं राजकारण आहे. मी देशाच्या राजकारणामध्ये अशी गोष्टच बघितली नाही. जातींचं राजकारण करुन या सगळ्या गोष्टी विसरायला लावत आहेत. आता महापुरुष सुद्धा वाटून घेतली आहेत. विनाकारण जातींमध्ये वाटप केलं जातं आहे. या दुसऱ्या जातींबद्दल द्वेष निर्माण केल्यामुळे परिस्थिती भीषण आहे. यातून महाराष्ट्र वाचवला पाहिजे,” असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे म्हणाले की, “निवडणूका येतात जातात. उमेदवार पडतात अन् निवडणून येतात. पण एकदा का राज्याचं व्याकरणं बिघडलं की सुधारता येणार नाही. मी जो प्रयत्न करतो आहे तो हा करतो आहे. मशिदींवरचे भोंगे मी खाली आणायला लावले. आले पण खाली अन् बंदी झाले. उद्धव ठाकरे हे तेव्हा मुख्यमंत्री होते. 17 हजार माझ्या मनसैनिकांवर केसेसे टाकल्या. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मशीदवरील भोंगे खाली करण्याचे सांगितले होते. ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? तुमचा कल कुठे आहे ते कळलं आहे आता,” असा घणाघात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
राहुल गांधीला अक्कल नाही
राज ठाकरे यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “राहुल गांधीला अक्कल पण नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघून ते तोंड फिरवतात. त्यांच्याबरोबर जाऊन हे बसले आहेत. का बसले होते तर स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी आणि मुख्यमंत्रिपदासाठी गेले. एका माणसानं सगळा पक्ष संपवला. जे लोक गेले त्यांना ते गद्दार बोलत आहेत. पण गद्दार तर घरात बसले आहेत. ज्यांनी पक्षाची गद्दारी केली,” असा घणाघात राज ठाकरे यांनी आपल्या प्रचाराच्या अखेरच्या सांगता सभेमध्ये केला.