Ajit Pawar group leader Narhari Zirwal Live News on Caste-wise Census
दिंडोरी : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते शक्तीप्रदर्शन करुन अर्ज दाखल करत आहेत. तर दिल्लीमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक देखील होत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नेत्यांची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. मात्र राज्यामध्ये राज्याचे राजकारण रंगले आहे. दिंडोरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये चुरशीची लढत सुरु आहे. महायुतीकडून अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघ हे महायुतीसाठी प्रतिष्ठेचे बनले आहेत. यामध्ये दिंडोरी मतदारसंघ अजित पवार गटासाठी महत्त्वाचा आहे. अजित पवार यांनी त्यांच्या प्रचाराचा धुराळा दिंडोरी मतदारसंघातून झाली होती. दिंडोरीमधून विद्यमान नरहरी झिरवाळ हे आमदार आहेत. ते राष्ट्रवादीचे नेते असून बंड झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी अजित पवारांची साथ दिली. आता 2024च्या विधानसभेसाठी नरहरी झिरवाळ यांना संधी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
आज शक्तीप्रदर्शन आणि उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरु आहे. दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या पाठीशी शरद पवार यांचा आशिर्वाद असल्याचे सूचक वक्तव्य केले. उमेदवारी मिळाल्यानंतर किती नेते हे झिरवाळ यांना साथ देणार असा मोठा प्रश्न देखील आहे याबाबत नरहरी झिरवाळ म्हणाले की, ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या बळावर मी उमेदवारी घेतली आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट असले तरी देखील मला जेष्ठ नेते शरद पवार यांचे दुरुन आशिर्वाद आहे,’ असे वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. त्यामुळे नरहरी झिरवाळ यांना शरद पवार यांचा पाठिंबा आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.