Photo Credit- Social Media
दिल्ली : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नवीन सरकार स्थापन होण्यासाठी अवघा एक महिना शिल्लक राहिला आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीमध्ये जागावाटपामध्ये आणि यादी जाहीर करण्यामध्ये बाजी मारली आहे. तिन्ही घटक पक्षांनी आपली पहिली यादी जाहीर केली असली तरी काही जागांवरुन महायुतीमध्ये कुरबुर सुरु आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि जागावाटपाचा निर्णय निकाली काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत.
महाराष्ट्राची निवडणुक जाहीर झाल्यापासून सर्व महायुतीच्या नेत्यांनी अनेकदा दिल्ली वारी केली आहे. भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे जागावाटप झाले आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे हे तिन्ही प्रमुख नेते हे निवडणुकांआधी बोलणी करण्यासाठी दिल्लीमध्ये गेले आहेत. त्याचबरोबर अमित शाह यांनी तीन वेळा महाराष्ट्र दौरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अनेकदा महाराष्ट्र दौरा केला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे महायुतीची अंतिम जागावाटपाची चर्चा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : आज जोरदार शक्तीप्रदर्शन! विखेंसह मुंडे, भुजबळ, पाटील करणार अर्ज दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारपर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पोहचणार आहेत. या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राज्यामध्ये राज्याचे राजकारण रंगले असले तरी दिल्ली दरबारी आणखी खलबत सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यामध्ये शक्तीप्रदर्शन सुरु असून दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा सुरु आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, भाजपला 152-155 जागा, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 78-80 जागा आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला 52-54 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपने 99, अजित पवार गटाने 38 तर शिंदे गटाने 45 उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र काही जागांवर तिढा कायम आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी शिंदे सेनेच्या स्वकृती शर्मा या दोन उमेदवारांवर भाजपने आक्षेप घेतला आहे. भाजप नेते सुरेश धस यांना आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे, मात्र या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब असून ते अजित पवार पक्षातील आहे. तासगाव मतदारसंघातही अशीच स्थिती आहे, जिथे भाजपला माजी खासदार संजय काका यांच्या मुलाला उमेदवारी हवी आहे. मात्र, अजित पवारांना ही जागा त्यांच्या पक्षासाठी हवी आहे, अशा काही जागांवरुन महायुतीचे जागावाटपाची बोलणी बाकी आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.