फोटो सौजन्य- सोशल मीडिया
काल दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आता राज्यात प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणूक आचारसंहिता काळात एकूण १८७ कोटींहून जास्त रकमेची मालमत्ता विविध अंमलबजावणी यंत्रणांनी जप्त केल्याची माहित मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी केद्रीय निवडणूक आयोगाकडून दिंनाक १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत ( दि. 30 ऑक्टोबर 2024) राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत मागील १५ दिवसांमध्ये एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
निवडणूक आचारसंहितेच्या या अत्यंत महत्वाच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्य पोलीस विभाग, इन्कमटॅक्स विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागांकडून जप्तीची कारवाई केली गेली आहे. राज्य पोलीस विभागाने सुमारे ७५ कोटी रूपये जप्त केले आहेत. त्यानंतर इन्कमटॅक्स विभागाने सुमारे ६० कोटी रूपये जप्त केले आहेत तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ११ कोटी रूपये जप्त करण्यात आले आहे.
मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ ॲपवर तक्रार करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.
सी-व्हिजिल ॲप (C-Vigil app)
राज्यातील निवडणूकीच्या या काळात सजग नागरिकांनी आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे हे सी-व्हिजिल ॲप (C-Vigil app) डाऊनलोड करावे. परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा आचारसंहितेचा भंग झाला असेल तर त्याची तक्रार नागरिकांना या ॲपवर करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. हे ॲप आचारसंहितेच्या काळात अत्यंत महत्वाचे योगदान देत आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची काल अंतिम तारीख होती. सोमवार 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवार त्यांची उमेदवारी मागे घेऊ शकतात. संपूर्ण राज्यात 20 नोव्हेंबर 2024 ला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर शनिवार, 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यासोबतच झारखंड राज्याच्या विधानसभेचा निकाल ही 23 तारखेला जाहीर केला जाणार आहे.