फोटो सौजन्य- iStock
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी काल 29 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. राज्यात तब्बल 7995 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे राज्यात आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. प्रचारासाठी महायुती महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांसहित इतर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहेच. उमेदवारांकडून मतदारसंघामध्ये लोकांशी संपर्क साधणे सुरु झाले आहे. काही ठिकाणी प्रचार सभांचेही आयोजन केले गेले होते. निवडणूकीच्या या रणधुमाळीत उमेदवाराच्या खर्चावर ही मर्यादा असते. या खर्चावर निवडणूक आयोगाचा लक्ष असतो. यासंबंधी खर्चाचे दर हे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घेऊया उमेदवार नेमका किती खर्च करु शकतो त्याबद्दल.
उमेदवार कार्यकर्त्यांच्या खानपानावर किती खर्च करु शकतो?
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या खानपानाकरिता उमेदवारांना मुभा दिली आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांसाठी शाकाहारी थाळी 80 रुपये, चहा 10 रुपये आणि उपमा, पोहे 15 रुपये असे दर निवडणूक आयोगाकडून निश्चित केले गेले आहेत. तसेच मासाहारी थाळीसाठी 200 रुपये दरही आयोगाकडून निश्चित केला आहे.
इतर खर्चासंबंधी माहिती
शाल- 50 रुपये, साधा फेटा- 50 रुपये, जरीचा फेटा- 100 रुपये, टोपी- 20 रुपये, गमचा- 40 रुपये, ढोलताशा-2500 रुपये, गुलाब पुष्पगुच्छ -500 रुपये, फटाके 180 ते 1800 रुपये. वाहनांचा खर्च इंधनासहित- दुचाकी-1200 रुपये, रिक्षा- 2500 रुपये, जीप टेंपो- 3500 रुपये, बस- 6000 ते 9000 रुपये, ट्रॅक्टर 3500 रुपये.
निवडणूक आयोगाने खर्चाच्या रक्कमेत केली वाढ
निवडणूक आयोगाने वाढती महागाई लक्षात घेऊन यावेळी 40 लाखांपर्यंत खर्च करण्याची परवानगी दिली आहे. या अगोदर या खर्चाची परवानगी ही 28 लाख रुपयांपर्यंत होती. यावर्षीच्या निवडणूकीमध्ये या खर्चात 12 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निवडणूक खर्चाच्या रकमेत सभा, प्रचारफेऱ्या, बैठका, सर्व प्रकारच्या जाहिराती, वाहन खर्च इत्यादींचा समावेश केला गेला आहे. निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या अशा जवळपास 500 वस्तूंचे दर ठरवून दिले आहेत . या ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त खर्च करणाऱ्या उमेदवारावर आचारसंहिता भगाची कारवाई केली जाणार आहे.
खर्च करण्यासाठी राष्ट्रीय किंवा सहकारी बॅंकेत खाते आवश्यक
निवडणूक आयोगाच्या अधीन राहूनच उमेदवारांना खर्च करता येणार आहे. हा खर्च उमेदवारी अर्ज केल्यापासून ग्राह्य धरला जाणार आहे. या खर्चासाठी उमेदवाराकडे राष्ट्रीय अथवा सहकारी बॅंकेत खाते असणे आवश्यक आहे. उमेदवारांना अर्ज भरताना खर्चाच्या नोदींकरिता रजिस्टरही दिले जाणार आहे. उमेदवारांना त्यामध्ये निवडणूक खर्चाची दैनंदिन नोंद करणे अनिवार्य असणार आहे. राज्यात पुढील 20 दिवस प्रचारांचे असणार आहेत. उमेदवारांनी मतदारांना कोणतेही आमिषे प्रलोभने देता येत नाही. यासाठी निवडणूक आयोगही सतर्क आहे.