Udayanraje Bhosale criticizes Sharad Pawar
सातारा : विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवारांची यादी आता जाहीर केली आहे. आता महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. नेत्यांनी एकमेकांवर टीका केली असून पक्षांतर देखील वाढली आहेत. अनेक इच्छुकांनी तिकीट न मिळाल्यामुळे इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. आता शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
उदयनराजे भोसले यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कराड दक्षिण मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. अतुल भोसले, भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य विक्रम पावसकर उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उदयनराजे भोसले यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, “कॉंग्रेसच्या राज्यामध्ये प्रकल्प रखडवून ठेवत यांनी केवळ जनतेची दिशाभूल केली आहे. त्यांचे सरकार असताना त्यांनी लाडकी बहीण योजना का नाही राबवली,” असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : ‘महायुतीच्या 288 पैकी केवळ 11 जागांवर चर्चा बाकी…’; अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
उदयनराजे भोसले यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. फोडाफोडीचे राजकारण शरद पवार यांनी सुरु केल्याची टीका देखील उदयनराजे भोसले यांनी केली. ते म्हणाले की, “खासदार शरद पवारांना राजकारणातील फोडाफोडीचे नोबेल पारितोषिकच दिले जावे. शरद पवारांचा पूर्वी बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व आठही जागांवर महायुतीचेच उमेदवार मताधिक्याने विजयी होतील. राजकीय फोडाफोडी झाली कोण कोणीकडे गेले तरी, खरा मुद्दा जनतेच्या विकासाचा. आणि जनविकासाचे प्रचंड काम भाजप आणि महायुतीने केल्याने सातारा जिल्हा हे पूर्वी कोणाचेही प्रभावक्षेत्र असले तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, उमेदवारांनी विकासाच्या प्रगतीपुस्तकावर बोलावे,” असे म्हणत खासदार उदयनराजे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
हे देखील वाचा : ‘अजितदादांनी मला अंधारात ठेवून केसाने गळा कापला…’; नाराज नेत्याची जहरी टीका
मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता राजकारणाची वाट धरली आहे. जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा निर्णय त्यांना हवा तसा न दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली. तसेच उमेदवार उभे करायचा निर्णय घेतला आहे. यावर उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “मनोजची मराठा आरक्षणाची मागणी रास्त आहे. पण, त्याचे राजकीय भांडवल करणे, भाजपवर रोष व्यक्त करणे योग्य नाही. जाती-पातीत भेदभाव हे सारे चुकीचे आहे,” असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.