Shrijaya Ashok Chavan is Bhokar BJP candidate
नांदेड : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केल्यानंतर राजकारणाला वेग आला आहे. भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या 99 उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली आहे. यामध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, भोकरमध्ये वडीलांचा राजकीय वारसा मुलीकडे देण्यात आला आहे.
खासदार अशोक चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली. अशोक चव्हाण यांच्या अनेक वर्षांच्या राजकीय प्रवासाला या भाजप प्रवेशामुळे नवीन वळण आले. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आल्यानंतर राज्यातून थेट केंद्रामध्ये गेले. राज्यसभेवर भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना संधी देण्यात आली. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदार संघामध्ये कोणाला संधी देणार याची उत्सुकता लागली होती.
आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 99 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही नवीन चेहऱ्यांनी यादीमध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया अशोक चव्हाण यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया अशोक चव्हाण यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
हे देखील वाचा : ब्रेकिंग! भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला मिळाली संधी?
भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीजया अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. उमेदवारीबद्दल त्यांनी महायुतीचे धन्यवाद मानले आहेत. श्रीजया चव्हाण म्हणाल्या की, पहिली निवडणूक असल्यामुळे खूप उत्साह आणि थोडी धाकधूक देखील आहे. जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे. पक्षश्रेष्ठींनी जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडणार आहे. आधी देखील प्रामाणिकपणे काम केलं आहे. आता देखील लोकांसाठी काम करतच राहू. जनतेच्या सेवेसाठी हजर राहू. माझ्या वडीलांनी जे संस्कार दिले आहेत त्यावर आणि भोकरमधील जनतेवर मला विश्वास आहे. नक्कीच ते आम्हाला मत देतील. आमच्या प्रचारामुळे भोकरमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आम्ही विजयी होणार, असा विश्वास श्रीजया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.