Supporters of Manoj Jarange Patil blocked Srijaya Chavan
भोकर : यंदाची विधानसभा निवडणूक जोरदार रंगणार आहे. बंडाचे राजकारण झाल्यानंतर ही राज्यामध्ये होणारी पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्याचबरोबर मागील दीड वर्षांपासून मराठ आरक्षणाचा लढा देणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पडणार आहेत. जरांगे पाटील यांनी सुद्धा विधानसभेच्या राजकारणामध्ये उडी घेतली आहे. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी भाजपचा उमेदवार रोखला आहे.
मराठवाडा व बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. राज्यभरामधून जरांगे पाटलांना मोठा पाठिंबा असला तरी मराठवाड्यामध्ये इतर पक्षांना जोरात ताकद लावावी लागणार आहे. भोकर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या उमेदवार असलेल्या श्रीजया चव्हाण व अशोक चव्हाण यांच्या पत्नी यांना जरांग पाटलांच्या समर्थकांनी गावामध्ये येण्यास मज्जाव केला आहे.
अर्धापूर तालुक्यातील गावामध्ये हा प्रकार घडला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक व युवा नेत्यांनी श्रीजया चव्हाण व अमिता चव्हाण यांना गावामध्ये येऊ दिले नाही. त्यांच्या समर्थकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ आणि मनोज जरांगे पाटील ‘आप आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा दिल्या. विशेष म्हणजे हा प्रकार त्यांच्याच मतदारसंघामध्ये घडला आहे. अर्धापूर तालुका हा भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. मराठा नेत्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे श्रीजया चव्हाण यांच्यासाठी पहिलीच विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची आणि चुरशीची ठरणार आहे.
हे देखील वाचा : आज जोरदार शक्तीप्रदर्शन! विखेंसह मुंडे, भुजबळ, पाटील करणार अर्ज दाखल
कोण आहेत श्रीजया चव्हाण?
लोकसभा निवडणूकीच्या पूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांची वर्णी दिल्लीमध्ये लागली. राज्यसभा खासदार म्हणून भाजपकडून अशोक चव्हाण यांना संधी देण्यात आली. अनेक वर्षे अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला राहिलेला भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन उमेदवारीची चाचपणी सुरु होती. पण वडिलांच्या मतदारसंघाची धुरा मुलीवर सोपावून भाजपकडून अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी देण्यात आली. महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीजया अशोक चव्हाण यांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण त्यांच्यासमोर मराठा आरक्षण व मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे मोठे आव्हान असणार आहे.