'ही निवडणूक म्हणजे तुमच्या-माझ्या स्वाभिमानाची लढाई'; धर्मराज काडादी यांचं विधान
सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभेची निवडणूक ही तुमच्या-माझ्या स्वाभिमानाची लढाई आहे. हा स्वाभिमान जपण्यासाठी ही लढाई आपल्याला जिंकावीच लागेल, असा निर्धार या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला. गेली दहा वर्षे लोकांनी ज्या अपेक्षेने भाजपला निवडून दिले, त्या अपेक्षा पूर्ण करण्यात आमदारांना अपयश आल्याचेही त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : ‘जनतेच्या पुण्याईवर अभिजीत पाटील विजय होतील’; खासदार ओमराजे निंबाळकर यांचं विधान
जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात आयोजित प्रज्ञावंतांच्या सहविचार सभेत ते बोलत होते. सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, अॅड. रा. गो. म्हेत्रस, स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. धर्मराज काडादी यांनी आपल्या भाषणातून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांची उकल केली. राज्यातील नाकर्ते सरकार आणि इथले निष्क्रिय आमदार यांच्यामुळेच हे प्रश्न सुटले नाहीत असेही ते म्हणाले.
तसेच ‘गेली दहा वर्षे लोकांनी ज्या अपेक्षेने भाजपला निवडून दिले, त्या अपेक्षा पूर्ण करण्यात आमदारांना अपयश आले आहे. विकासाची कामे करण्याऐवजी त्यांनी सूडाचे राजकारण केले. व्यक्तिद्वेष करण्यातच आपली शक्ती वापरली. त्यामुळे मतदारसंघातील एकही प्रश्न सुटला नाही. विकासाची दृष्टी नसलेल्या अहंकारी आमदाराला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला हे कर्तव्य पार पाडाट, असे आवाहन त्यांनी केले.
अनेक सार्वजनिक संस्था उभ्या केल्या
काडादी म्हणाले, कर्मयोगी अप्पासाहेब काडादी, वि. गु. शिवदारे, आनंदराव देवकते, बाबूराव चाकोते, कमळे गुरुजी, ब्रह्मदेव माने यांनी सार्वजनिक संस्था उभ्या केल्या. यामुळे दक्षिण सोलापूरचा विकास झाला. सिध्देश्वर परिवाराच्या माध्यमातून या संस्था पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. सिध्देश्वर कारखान्याचे आज तीस हजार सभासद आहेत. इथेनॉल, सहवीजनिर्मिती प्रकल्प उभे केले. गाळप क्षमता प्रतिदिन तीन हजारांवरुन दहा हजार केली. 38 मेगावॉट सहवीजनिर्मितीचा प्रकल्प केला. यामुळे कारखान्याचे उत्पन्न वाढले. गेली तीन वर्षे इतरांच्या तुलनेत प्रतिटन चारशे रुपये जास्त दर दिला. यामुळे शेतकर्यांमध्ये विश्वास निर्माण झाला.
‘सिद्धेश्वर’ची चिमणी स्वार्थापोटी पाडली
सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी केवळ द्वेष आणि स्वार्थापोटी पाडली. स्वतःचा कारखाना चालावा यासाठी सिध्देश्वर कारखाना बंद पाडण्याचा कुटील डाव होता. विमानसेवेचे नाव पुढे करुन चिमणी पाडली. वर्ष उलटून गेले तरी विमानसेवा सुरु झाली नाही. 2007 मध्ये तत्कालीन शासनाने होटगी विमानतळाच्या जागेवर आयटी पार्क उभारण्याचा निर्णय घेतला होता. बोरामणी येथे मोठे विमानतळ सुरु करण्याची योजना आखली. त्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले. सरकार बदलल्यानंतर याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असेही ते म्हणाले.