Tuzya Ayla Song Release: ‘बागड बागड…’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
नेहमी प्रवाहापेक्षा वेगळ्या वाटेने जाणाऱ्या चित्रपटांद्वारे विविधांगी विषय रसिकांसमोर सादर करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके आहेत. दिग्दर्शन तसेच पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्या धोरणात्मक भागीदारी अंतर्गत निर्मिती या चित्रपटाला लाभली आहे. या चित्रपटातील ‘बागड बागड…’ हे महत्त्वपूर्ण गाणे रसिक दरबारी सादर झाले आहे. अर्थपूर्ण शब्दरचना, सुमधूर संगीत, लयबद्ध चाल आणि मनाला भिडणारे सूर यांचा संगम या गाण्यात जाणवतो. ‘तुझ्या आयला’ हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या कथेला गती प्रदान करण्यासाठी गाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. नुकतेच प्रदर्शित झालेले ‘तुझ्या आयला’ या चित्रपटातील ‘बागड बागड…’ हे गाणेही कथानकात अतिशय महत्त्वाच्या वळणावर येते. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी गायलेले ‘बागड बागड…’ हे गाणे गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून आकाराला आले आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे संगीतकार वरुण लिखते यांनी या गाण्याला संगीतसाज चढवला आहे. ‘बागड बागड…’ हे गाणे झी म्युझिक अंतर्गत सादर करण्यात आले आहे. Tuzya Ayla Song Release:
किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाचा ठाव यात घेण्यात आला आहे. ‘जिथं जिथं गेलास तू, उमटला तुझा ठसा…’ असा मुखडा असलेल्या या गाण्यात शालेय जीवनातील खेळ, धमाल, मजा, मस्ती, दंगा, भटकंती, भांडणे, हाणामाऱ्या, मैत्री, दुरावा, आपलेपणा यांची झलक पाहायला मिळते. थकल्या-भागल्या मनाला उभारी देण्याचे काम करणारे हे गाणे ‘तुझ्या आयला’च्या कथानकात एका अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी येते आणि चित्रपटाला गती प्रदान करते. प्रदर्शित करण्यात आलेल्या गाण्यामध्ये ‘तुझ्या आयला’ या खेळाची झलकही पाहायला मिळते.
वास्तवदर्शी लोकेशनवर नैसर्गिक प्रकाशात चित्रीत केलेले हे गाणे नेत्रसुखद वाटते. ‘उनाड दुपारी बागड बागड…’ हे या गाण्याची पंचलाईन आहे. या गाण्यातील हे चार अतिशय महत्त्वाचे शब्द प्रत्येकाला बालपणी दुपारच्या भर उन्हात केलेल्या भटकंतीची आठवण करून देणारे आहेत. अवधूत गुप्ते यांनी अतिशय ठसकेबाज तालामध्ये या गाण्यातील शब्दांना न्याय दिला आहे. वरुण लिखते यांच्या सुमधूर संगीताची किनार लाभल्याने हे गाणे अधिकच श्रवणीय बनले आहे.
पॅनोरमा स्टुडिओजच्या वतीने कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि मुरलीधर छतवानी, कल्ट डिजिटलच्या वतीने सुनील जैन, आदित्य जोशी, तर प्रकाश फिल्म्सच्या वतीने राजेश सिंह यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुशांत वेंगुर्लेकर, मोहित अरोरा आणि मेघना प्रमाणिक सहनिर्माते आहेत. या चित्रपटात राजश्री देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, संभाजी भगत, अभिजित थिटे, सोहम बाबर आणि अभिषेक झेंडे यांच्या प्रमुख भूमिका असून, अनेक गुणी बालकलाकारही या चित्रपटाचा भाग आहेत. ‘तुझ्या आयला’ हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.






