

Bigg Boss 20 : सलमान खानचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस २०’ सध्या स्पर्धकांमधील वाद आणि भांडणांमुळे चर्चेत आहे. शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये जोरदार वाद झाले. अशातच निर्मात्यांनी शोचा एक नवा प्रोमो रिलीज केला असून, यामध्ये स्काउट ओपी गुल्लूशी बोलताना दिसत आहे. या संभाषणात स्काउटने लव गिलसोबतच्या मैत्रीबद्दल काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.
नव्या प्रोमोमध्ये स्काउट ओपी रात्री आपल्या बेडवर बसून गुल्लूशी संवाद साधताना दिसतो. यावेळी तो लवसोबत घालवलेल्या क्षणांची आठवण काढतो आणि एका व्यक्तीवर खूप वेळ वाया घालवल्याची खंत व्यक्त करतो. स्काउट म्हणतो, “मी एका व्यक्तीवर खूप वेळ वाया घालवला आहे. ती माझ्या जेवणाची काळजी घ्यायची, रोज माझ्या केसांना तेल लावायची, सकाळी मला उठवायची आणि माझे अंतर्वस्त्रसुद्धा धुवायची. आमचं नातं एका बेड-हबमध्ये बदललं होतं.”
तो पुढे म्हणतो, “ती फक्त ३० सेकंद माझ्याकडे बघायची आणि मी तिच्यात पूर्णपणे हरवून जायचो. मी तिला असा दर्जा का दिला, हे मला कळत नाही. मी इतका संतापलो होतो की स्वतःचे केस कापले. आयुष्याने मला मानसिक धक्का दिला.” स्काउटचे हे बोलणे ऐकल्यानंतर गुल्लू त्याला, “तू वेडा होतास,” असे उत्तर देतो.
‘बिग बॉस २०’च्या सुरुवातीपासूनच स्काउट ओपी आणि लव गिल यांच्यात घट्ट मैत्री पाहायला मिळाली होती. दोघेही एकमेकांना भाऊ-बहीण मानत होते. मात्र, त्यांच्या या मैत्रीवर काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. शोचा होस्ट सलमान खाननेही त्यांच्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित केले होते.
इतकेच नाही, तर स्काउट ओपीची गर्लफ्रेंड काश्वी हिनेदेखील शोमध्ये येऊन त्याला लवपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या स्काउट आणि लव एकमेकांशी बोलत नसल्याचे सांगितले जात आहे. आता स्काउटने गुल्लूसमोर केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांची मैत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या प्रोमोचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.