( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Tujhya Aaila Teaser: मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक सुजय डहाके पुन्हा एकदा एका हटके विषयासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या आगामी ‘तुझ्या आयला’ या चित्रपटाचा टीझर अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या हस्ते नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या टीझरने चित्रपटाच्या विषयाबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे.
पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्या भागीदारीतून ‘तुझ्या आयला’ची निर्मिती करण्यात आली आहे. टीझर रिलीजच्या वेळी अमृता खानविलकरने सुजय डहाके यांच्या दिग्दर्शनशैलीचं कौतुक केलं.
अमृताच्या मते, सुजय डहाके यांच्या चित्रपटांची पहिली झलकच प्रेक्षकांना त्यांच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाते. ‘तुझ्या आयला’चा टीझरही काही सेकंदांत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो, असं तिने सांगितलं.
‘तुझ्या आयला’ हे चित्रपटाचं शीर्षकच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, या शीर्षकामागे नेमका कोणता खेळ आहे, हे टीझर पाहिल्यानंतर जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते.
‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते’ ही चित्रपटाची टॅगलाइनही लक्ष वेधून घेते. शाब्दिक हिंसा, त्याचा समाजावर होणारा परिणाम आणि डिजिटल जगात वाढत चाललेला भाषेचा गैरवापर यांसारख्या विषयांवर चित्रपट भाष्य करणार असल्याचे संकेत मिळतात.
“शाब्दिक हिंसेने मला भुरळ घातली”
दिग्दर्शक सुजय डहाके यांनी चित्रपटाच्या विषयाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शाब्दिक हिंसा ही त्यांना कायमच आकर्षित करणारी आणि अस्वस्थ करणारी गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
विशेषतः आईसारख्या प्रेम आणि आदराच्या नात्याशी संबंधित शब्दांचा अपमानास्पद वापर समाजात सहज स्वीकारला जात असल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘तुझ्या आयला’च्या माध्यमातून शब्दांची ताकद आणि त्यातून होणाऱ्या परिणामांवर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचं डहाके यांनी सांगितलं.
चित्रपटात राजश्री देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, संभाजी भगत, अभिजित थिटे, सोहम बाबर आणि अभिषेक झेंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय अनेक बालकलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.
पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.






