
फोटो सौजन्य - Social Media
कलर्स मराठीवरील लोकप्रिय आध्यात्मिक मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ सध्या अत्यंत निर्णायक आणि गूढ वळणावर पोहोचली आहे. स्वामी समर्थांनी घेतलेल्या एका अचानक निर्णयामुळे स्वामीस्थानावर अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रत्येक जण त्यांच्या पुढील लीलांकडे कुतूहलाने पाहत आहे. स्वामींच्या हालचाली, काही निवडक व्यक्तींची तयार होत असलेली यादी आणि “योग्य वेळ आली की सगळं कळेल” हे स्वामींचे गूढ शब्द अनेक प्रश्न उभे करत आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये आता श्री मल्लिकार्जुनाचा उल्लेख अधिक ठळकपणे पुढे येत असून, श्रद्धा, सेवा आणि विश्वास यांची खरी कसोटी सुरू झाल्याचे पाहायला मिळते.
या कथानकात स्वामीस्थानावर सुरू असलेला एक अनपेक्षित प्रवास आणि पुण्यातील नंदराम गवंडी या गंभीर आजारी शिवभक्ताची कथा एकमेकांशी घट्ट जोडली जाते. नंदराम हा परम शिवभक्त असून त्याच्या आजारपणावर वैद्यकीय उपचारांचा शेवटचा आधारही संपत चालला आहे. अशा अवस्थेत त्याच्यासमोर दोन मार्ग उभे राहतात. एकीकडे श्री मल्लिकार्जुन दर्शनाची तीव्र ओढ आणि दुसरीकडे सोमवारच्या दिवशी स्वामींनी दिलेली सेवाची अट. श्रद्धा आणि आज्ञापालन यामधील हा संघर्ष नंदरामला आतून अस्वस्थ करतो.
सोमवार उजाडतो. स्वामींच्या सेवेत मन लावण्याचा प्रयत्न करत असतानाही मल्लिकार्जुन दर्शनाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. दर्शनासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात आणि नंदराम पूर्णपणे हताश होतो. मात्र, याच क्षणी स्वामींच्या श्री मल्लिकार्जुन रूपातील अद्भुत आणि अलौकिक लीला प्रकट होते. या दिव्य दर्शनातून नंदरामला केवळ उत्तरच मिळत नाही, तर श्रद्धेचा खरा अर्थही उमगतो. स्वामींची ही लीला केवळ चमत्कार नसून, विश्वास आणि सेवाभावाची खरी शिकवण देणारी ठरते.
श्री मल्लिकार्जुन रूपात स्वामींनी दर्शन देण्यामागचा नेमका उद्देश काय आहे, याचाही उलगडा हळूहळू होऊ लागतो. या दर्शनानंतर स्वामी एक ठाम आणि धक्कादायक निर्णय घेतात, जो स्वामीस्थानातील प्रत्येकालाच चकित करतो. हा निर्णय केवळ एका भक्ताच्या आयुष्याशी संबंधित नसून, पुढील घटनांना दिशा देणारा ठरतो. त्यामुळे कथा एका नव्या, उत्कंठावर्धक वळणावर येऊन थांबते आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढते.
श्रद्धा, सेवा, समर्पण आणि विश्वास यांचा सुंदर संगम दाखवणारी ही दिव्य लीला प्रेक्षकांसाठी एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे. स्वामींच्या श्री मल्लिकार्जुन रूपातील दर्शन, त्यामागचा अर्थ आणि स्वामींचा पुढील निर्णय जाणून घेण्यासाठी ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका दररोज संध्याकाळी ७.३० वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर पाहायला विसरू नका.