Mee Sansar Mazha Rekhite: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी एक आई दुर्गेचं रूप धारण करत अन्यायाविरुद्ध कशी लढते, हे मालिकेच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. अनुप्रिया कोचला धडा शिकवणार असली, तरी त्यानंतर तिच्यासमोर कोणती आव्हानं उभी राहणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रोमोला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून हा महाएपिसोड ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता सन मराठीवर प्रसारित होणार आहे.
अनुप्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीप्ती केतकर म्हणाली की, ” एक आई आपल्या मुलीच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभी असते. पण वेळ आली तर ती दुर्गेचा अवतार घ्यायला पण मागे पुढे बघत नाही. असच काहीस मालिकेत पाहायला मिळणार आहे. या महाएपिसोडसाठी आमच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. आता पर्यंत प्रेक्षकांनी अनुप्रियाची मायाळू बाजू पाहिली पण आता तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी तिची दुसरी बाजू पाहायला मिळणार आहे. ”
मालिकेव्यतिरिक्त अभिनेत्रीने स्वतःच्या आयुष्यातील नवदुर्गेबद्दल सांगताना म्हणाली की, “माझ्या आयुष्यात आई आणि सासू या दोघींचंही खूप महत्त्वाचं स्थान आहे. आयुष्यात कोणताही कठीण प्रसंग आला तरी हार मानायची नाही, तर त्याला धैर्याने सामोरं जायचं, ही शिकवण मला दोघींकडून मिळाली. माझ्या स्वप्नांना त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला आणि ती पूर्ण करण्यासाठी मला बळ दिलं.
नवरात्रीनिमित्त देवीकडे मनापासून एकच गोष्ट मागावीशी वाटते की, समाजातील वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात, प्रत्येकाने एकमेकांना समजून घ्यावं आणि आनंदाने जगावं. समाजात प्रेम, आपुलकी आणि सकारात्मकता वाढावी. याचबरोबर प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे. कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नये. स्वतःची ओळख निर्माण करणं आणि आपल्या आनंदाला महत्त्व देणं तितकंच गरजेचं आहे.”






