

Pocket Novel Movie:दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय सेतुपती पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘सुपर डिलक्स’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक थियागराजन कुमारराजा आणि विजय सेतुपती यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. त्यांच्या आगामी ‘पॉकेट नोवेल’ या चित्रपटातील विजय सेतुपतीचे काही नवे फोटो सोशल मीडियावर समोर आले असून, त्याच्या लुकची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
‘पॉकेट नोवेल’मधील विजय सेतुपतीची नवीन छायाचित्रे समोर येताच चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. या फोटोंमध्ये त्याचा साधा, पण प्रभावी अंदाज पाहायला मिळत आहे. याआधीच्या चित्रपटांमधील भूमिकांपेक्षा त्याचा हा लुक काहीसा वेगळा दिसत आहे. त्याची शरीरयष्टी अधिक तंदुरुस्त आणि बांधेसूद दिसत असून, या नव्या रूपामुळे त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्याच्या लुकसोबतच देहबोलीत झालेला बदलही लक्षवेधी आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना केवळ अभिनेत्याची प्रतिमा न पाहता कथेची आणि भूमिकेची गरज लक्षात घेतल्याचे त्याच्या नव्या अंदाजातून जाणवते.
‘सुपर डिलक्स’नंतर थियागराजन कुमारराजा आणि विजय सेतुपती पुन्हा एकत्र
‘पॉकेट नोवेल’चे दिग्दर्शन थियागराजन कुमारराजा करत आहेत. यापूर्वी त्यांनी विजय सेतुपतीसोबत ‘सुपर डिलक्स’ या चित्रपटात काम केले होते. आता अनेक वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकत्र येत असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
या चित्रपटात विजय सेतुपतीसोबत मालविका मोहनन, राज बी. शेट्टी आणि किशोर कुमार जी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे लेखन अँड्र्यू लुईस यांनी केले असून, जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी संगीत दिले आहे.
थियागराजन कुमारराजा आणि एस. डी. एझिलमथी यांनी टायलर डर्डन आणि किनो फिस्ट या त्यांच्या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पोंगलच्या मुहूर्तावर १४ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘विक्रम वेधा’, ‘महाराजा’ आणि ‘बथ्था’ यांसारख्या चित्रपटांमधून विजय सेतुपती यांनी आपल्या अभिनयातील वेगळेपणा आणि सहजता दाखवून दिली आहे. प्रत्येक भूमिकेत काहीतरी नवीन सादर करण्याची त्यांची शैली प्रेक्षकांना भावते. त्यामुळे थियागराजन कुमारराजा यांच्यासोबतची त्यांची पुनर्भेट आणि मालविका मोहनन, राज बी. शेट्टी व किशोर यांसारख्या कलाकारांची उपस्थिती यामुळे ‘पॉकेट नोवेल’ हा आगामी काळातील चर्चेचा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. आता या चित्रपटातून कोणते अनोखे कथाविश्व प्रेक्षकांसमोर येणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.