फोटो सौजन्य सोशल मिडिया
शांता शेळके यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांनी मराठी भावविश्व समृद्ध केले आहे. त्यांच्या शब्दांमधील भावस्पर्शी संवेदना, निसर्ग, प्रेम, भक्ती आणि जीवनानुभव यांना लाभलेली सुरेल चाल यामुळे ही गीते आजही रसिकांच्या मनात अढळ स्थान टिकवून आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘शब्द सुरांचे चांदणे’ या कार्यक्रमातून त्यांच्या अजरामर गीतांना संगीतबद्ध स्वरूपात आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ पासून मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही जागा राखीव आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘शब्द सुरांचे चांदणे’ या शांता शेळके यांच्या अजरामर गीतांच्या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
या मैफलीत नचिकेत देसाई, धनंजय म्हसकर, केतकी चैतन्य आणि धनश्री देशपांडे हे गायक कलाकार शांता शेळके यांच्या शब्दांतील लोकप्रिय गीते सादर करणार आहेत. अनघा मोडक निवेदिका म्हणून कार्यक्रमाची सूत्रे सांभाळणार आहेत.
कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे असून, वाद्यसाथीसाठी प्रशांत लळित, दर्शना जोग, प्रणव हरिदास, सूर्यकांत सुर्वे, प्रभाकर मोसंबकर आणि अभिजित सावंत सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना रूपक संजीव लेले आणि राहुल शशिकांत भावे यांची आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. मराठी साहित्य आणि संगीत क्षेत्रातील अजरामर कलाकृतींचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत प्रसारण करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.






