
मधुमेहामुळे होतात हाडे कमकुवत होतायत ? मग तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या...
बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल लहान वयात देखील मधुमेहाचा त्रास असणं हे सर्वसाधारणं झालं आहे. मात्र असं असलं तरी मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी वेळच्या वेळी वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे. मधुमेहामुळे केवळ स्ट्रोक किंवा हृदयरोग होऊ शकतो असे आपल्याला वाटते तर प्रत्यक्षात तसे नसून यामुळे हाडं आणि सांधे देखील कमकुवत होतात. रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळे हाडांचा कमकुवतपणा, सांधेदुखी आणि लवकर बरे न होणे यासारख्या समस्या उद्भवतात, ज्यामुळे ऑस्टियोआर्थरायटिस (सांध्यांची झीज होते ज्यामुळे सांध्यामध्ये सूज, ताठरता आणि वेदना होतात) आणि फ्रोजन शोल्डर (ज्याला अॅडहेसिव्ह कॅप्सुलायटिस असेही म्हणतात जे खांद्याच्या सांध्यातील हालचाल मर्यादित करते) सारख्या आजारांचा धोका वाढतो. मधुमेह असलेल्यांना गुडघ्याच्या ऑस्टियोआर्थरायटिस आणि लिगामेंटला इजा होण्याची शक्यता अधिक असते, ज्यामुळे सांध्याची काळजी घेणे हा देखील मधुमेह व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग ठरते.उच्च रक्तातील साखरेची पातळी हाडे आणि सांध्यांना प्रभावित करते. याबाबत डॉ आशिष अरबट, ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, जहांगीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, पुणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं आहे.
कमकुवत हाडे: मधुमेह हाडांची निर्मिती आणि बळकटीवर परिणाम करते.ज्यामुळे हाडांची घनता कमी होते. हाडे कमकुवत होतात आणि फ्रॅक्चरची शक्यता वाढते.
सांधेदुखी आणि स्नायुंचा कडकपणा: उच्च ग्लुकोजच्या पातळीमुळे सांध्यामध्ये जळजळ होते, ज्यामुळे वेदना, स्नायुंचा कडकपणा आणि गतिशीलता कमी होते. त्यामुळे, दैनंदिन कामे सहजतेने करणे कठीण होते.
बरं होण्यास वेळ लागणे: मधुमेहामुळे रक्ताभिसरण बिघडल्याने फ्रॅक्चर आणि सांध्याच्या दुखापतींसाठी बरे होण्याची प्रक्रिया मंदावते.
ऑस्टियोआर्थरायटिसचा धोका वाढतो: मधुमेहींना जास्त वजन, जळजळ आणि सांध्याचे नुकसान झाल्यामुळे ऑस्टियोआर्थरायटिस होण्याचा धोका अधिक असतो, विशेषतः गुडघ्यांमध्ये, ज्यामुळे सांधे खराब होतात.
फ्रोझन शोल्डर: मधुमेहामुळे अॅडहेसिव्ह कॅप्सुलायटिस किंवा फ्रोझन शोल्डर नावाची स्थिती देखील उद्भवते, ज्यामुळे खांद्याच्या सांध्यामध्ये कडकपणा आणि वेदना होतात.
लिगामेंट संबंधीत दुखापती: उच्च ग्लुकोज पातळी ही लिगामेंट्स कमकुवत करू शकते, ज्यामुळे मधुमेही व्यक्तींना वेळेवर उपचार करण्याची आवश्यकता असते.
कॅल्शियम आणि व्हिटॅमिनयुक्त आहाराची निवड करा आणि तुमच्या जेवणात दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या, काजू आणि मासे यांचा समावेश करा. साखरेचे प्रमाण अधिक असलेले प्रक्रिया केलेले पदार्थ आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे सेवन टाळा. चालणे, जीम आणि योगा यासारखे व्यायाम हाडांची ताकद आणि सांध्याची लवचिकता सुधारण्यास मदत करू शकतात. सांधेदुखी असलेल्यांसाठी पोहणे आणि सायकलिंग हे व्यायाम प्रकार देखील फायदेशीर ठरतात. धूम्रपान आणि मद्यपानाचे सेवन टाळणे सोडा आणि सांध्यावरील दबाव कमी करण्यासाठी इष्टतम वजन राखा.
काही प्रकरणांमध्ये रुग्णाला रोबोटिक पध्दतीने गुडघे प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जाऊ शकतो. गुडघ्याच्या सांध्याच्या बदलासाठी ही किमान आक्रमक प्रक्रिया अचूक ठरते, ज्यामुळे जलद पुनर्प्राप्ती होते. ऑस्टियोआर्थरायटिस असलेल्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे प्रामुख्याने फायदेशीर ठरते. आर्थ्रोस्कोपीसारख्या प्रक्रिया पारंपारिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत कमीत कमी जोखमीसह सांध्याचे नुकसान कमी करण्यास मदत करू शकतात. मधुमेहींमध्ये हाडे आणि सांध्यातील गुंतागुंत वेळीच ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. नियमितपणे हाडांची घनता तपासणे, सांध्यांचे मूल्यांकन आणि नियमित तपासणीमुळे या समस्येचे वेळीच निदान होण्यास मदत होते, ज्यामुळे गतिहीनता टाळता येणे शक्य होते.