
मेट्रोपोलिस फाऊंडेशन, जी मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडची सीएसआर शाखा आहे, तिने मुंबईमध्ये अडोलसेंट रिप्रॉडक्टिव्ह अँड सेक्स्युअल हेल्थ (एआरएसएच) कॉन्क्लेव्हचे आयोजन केले. हा उपक्रम ‘टू शाय टू आस्क’ (टीएसटीए) या सीएसआर उपक्रमाचा भाग आहे, जो किशोरवयीन मुलींच्या आरोग्य जागरूकतेला चालना देतो. ‘टीएसटीए’ उपक्रम फिजिकल व डिजिटल आऊटरिचच्या माध्यमातून तरुणींना शिक्षित, सक्षम आणि प्रेरित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. ऑन-ग्राउंड हस्तक्षेप आणि विज्ञान-आधारित ‘टू शाय टू आस्क’ अॅपद्वारे किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती पुरवली जाते.
एआरएसएच उपक्रमाने २०२१-२२ पासून महाराष्ट्र व चेन्नईतील शहरी व ग्रामीण भागांमध्ये कार्यरत राहून मोठा बदल घडवला आहे. या उपक्रमाअंतर्गत १७ ब्लॉक्स, ६०६ गावे आणि २३८ पंचायतींमध्ये पोहोच मिळवण्यात आली असून, २.२ लाख किशोरवयीन मुलींना सक्षम करण्यात आले आहे. अप्रत्यक्षपणे १.१ दशलक्ष व्यक्तींना या उपक्रमाचा लाभ झाला आहे. किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी सहाय्यक वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम तीन आधारस्तंभांवर आधारित आहे – प्रजनन व लैंगिक आरोग्यात क्षमता निर्मिती, १० ते १५ मुलींचे किशोरी मंच तयार करणे आणि पंचायत सदस्य, आशा व शालेय शिक्षकांचा सहभाग.
‘किशोरी मंच’ हे उपक्रमाचे महत्त्वाचे अंग असून, हे किशोरवयीन-नेतृत्वित सल्लागार गट आहेत. हे गट बालविवाह, मासिक पाळी स्वच्छता आणि लैंगिक शिक्षण यांसारख्या सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्य करतात. त्यांनी त्यांच्या समुदायांमध्ये बालविवाहाविरोधात रॅली काढल्या, शाळांमध्ये स्वच्छता सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आणि ग्रामपंचायतींना बालविवाहविरोधी ठराव मंजूर करण्यास भाग पाडले.
या उपक्रमाच्या प्रभावाविषयी बोलताना मेट्रोपोलिस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. दुरू शाह म्हणाले, “किशोरवयीन मुली या केवळ लाभार्थी नसून समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत नेतृत्वही करत आहेत. त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होत असून, त्या सामाजिक रूढींना आव्हान देत आहेत.” मुंबईतील कॉन्क्लेव्हमध्ये १०० हून अधिक किशोरवयीन लीडर्स, एनजीओ भागीदार, पंचायत सदस्य आणि आरोग्यतज्ञ सहभागी झाले. किशोरी मंचच्या सदस्यांनी नाट्यप्रयोग आणि भूमिका सादर करून त्यांच्या कार्याची झलक दाखवली. हा उपक्रम सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.