फोटो सौजन्य - Social Media
महिलांच्या सक्षमीकरणाला आणि आरोग्यविषयक जागरूकतेला चालना देण्यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटल्सने ‘मी निर्भय’ (I Am Fearless) या वार्षिक मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा केला. मुंबई सेंट्रल येथील मुख्य रुग्णालयासह मीरा रोड, राजकोट आणि नागपूरसारख्या विविध शाखांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये 1800 हून अधिक महिला कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, प्रशासकीय अधिकारी आणि अन्य कर्मचारी सहभागी झाले.
महिलांच्या आरोग्यविषयक महत्त्वाच्या मुद्यांवर जागरूकता निर्माण करणे, महिलांना आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन करणे आणि संस्थेमध्ये एकता आणि पाठबळाचा संदेश देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या विशेष कार्यक्रमात स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूती सल्लागार आणि ब्रेस्ट कन्सलटंट यांनी महिलांच्या आरोग्याविषयी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. पुनरुत्पादक आरोग्यासंबंधी सामान्य समस्या, स्तनाच्या आजारांपासून बचावासाठी आवश्यक असलेली नियमित तपासणी आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्यदायी सवयींचे महत्त्व यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
महिला केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर आर्थिक स्वायत्ततेसाठीही सक्षम व्हाव्यात, यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटल्सने महिलांसाठी विशेष आर्थिक साक्षरता कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेत आर्थिक नियोजन, गुंतवणूक संधी आणि भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्याच्या तंत्रांवर मार्गदर्शन करण्यात आले. वोक्हार्ट हॉस्पिटल्सने 1 ते 6 मार्च 2025 या कालावधीत महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी सवलती दिल्या. यामध्ये पॅप स्मीअर चाचणी, मॅमोग्राफी आणि डॉक्टर सल्ल्यासाठी 25% सवलत देण्यात आली. या सवलतीचा लाभ घेत अनेक महिला कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय संचालिका जहाबिया खोराकीवाला यांनी सांगितले की, “महिलांना निर्भयपणे जगण्यासाठी सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. ‘मी निर्भय’ ही मोहीम महिलांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारी आहे. महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा एक योग्य प्रयत्न आहे.” वोक्हार्ट हॉस्पिटल्स ग्रुपचे एचआर हेड अमिया कुमार साहू म्हणाले, “या मोहिमेमुळे आम्हाला केवळ महिलांचा सन्मान करण्याची संधी मिळाली नाही, तर त्यांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलता आली. महिलांना संस्थेत अधिक प्रभावी भूमिका मिळावी यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.” या उपक्रमाद्वारे वोक्हार्ट हॉस्पिटल्सने महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकतेला चालना दिली. ‘मी निर्भय’ ही मोहीम महिलांना सशक्त आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी प्रेरित करण्याचे उत्तम उदाहरण ठरली.