
Court Decision
जयपूर : बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या 11 वर्षाच्या मुलीला आता मूल जन्माला घालावे लागणार आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने मुलीला गर्भपात करण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने मुलीची याचिका फेटाळताना आपल्या निर्णयात म्हटले आहे की, पूर्ण विकसित गर्भालाही जगण्याचा, या जगात येण्याचा आणि निरोगी जीवन जगण्याचा अधिकार आहे.
राजस्थान येथे एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. यातून ती गर्भवती राहिली होती. ती 31 आठवड्यांची गरोदर राहिली. दरम्यान, यामुळे तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तिला आठवण होत असल्याने तिने गर्भपात करण्याची परवानगी उच्च न्यायालयाला मागितली होती. मात्र, ही याचिका कोटनि फेटाळली आहे. त्यामुळे आता तिला हे मूल जन्माला घालावे लागणार आहे. जन्म द्यावाच लागणार आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीनुसार न्यायमूर्ती अनुप कुमार धांड म्हणाले की, वैद्यकीय मंडळाच्या सल्ल्यानुसार, गर्भाचे वजन वाढत आहे आणि त्याचे सर्व महत्त्वाचे अवयव पूर्ण विकसित झाले आहेत. न्यायमूर्ती धांड म्हणाले, मूल आता जन्माला आले आहे, त्यामुळे गर्भपाताला परवानगी देता येणार नाही. ते म्हणाले की, अशाच दोन प्रकरणांवर सुनावणी करताना पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयानेही गर्भपाताची परवानगी नाकारली होती.