कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट: आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी
केरळमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने आधीच चिंता वाढवली असताना, आता राज्याला आणखी एका आरोग्य संकटाचा सामना करावा लागत आहे. थ्रिसूर जिल्ह्यात हेपेटायटीस (Hepatitis) रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. विशेषतः हेपेटायटीस A आणि E प्रकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असून याचे मुख्य कारण दूषित अन्न आणि पाणी असल्याचं मानलं जात आहे.
थ्रिसूर जिल्ह्यात हेपेटायटीसच्या वाढत्या घटनांनंतर जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (DMO) नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. फक्त उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच प्या, आणि बाहेरचे बासी किंवा दूषित अन्न टाळा. विशेषतः हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या अन्न पदार्थांबाबत स्वच्छतेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहे.
पब्लिक हेल्थ एक्स्पर्ट डॉ. समीर भाटी यांच्या मते, केरळमध्ये पसरत असलेल्या संसर्गामागे मुख्यतः हेपेटायटीस A आणि E व्हायरस कारणीभूत आहेत. हे विषाणू दूषित पाणी आणि अन्नातून पसरतात. केरळमध्ये पावसाळ्याची चाहूल लागलेली असून, अशा हवामानात पाण्याच्या साठ्याचे प्रदूषण आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो.
Cleveland Clinic च्या माहितीनुसार, हेपेटायटीसचे लक्षणे शरीरात संसर्ग झाल्यानंतर १५ ते ६० दिवसांनी दिसू शकतात. यामध्ये खालील लक्षणांचा समावेश होतो:
सतत थकवा, अशक्तपणा
ताप आणि अंगदुखी
मळमळ, डोकेदुखी
त्वचा आणि डोळ्यांचा पिवळसरपणा (जॉन्डिस)
लघवीचा रंग गडद होणे
पचनतंत्राशी संबंधित तक्रारी, जसे की जुलाब
या लक्षणांपैकी कोणतेही जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. स्वतःहून औषधे घेणे धोकादायक ठरू शकते.
प्रतिबंधात्मक उपाय
हेपेटायटीसपासून बचाव करण्यासाठी खालील उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत:
नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या
शक्यतो बाहेरचे अन्न टाळा
हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवतांना पाण्याची स्वच्छता तपासा
हात साबणाने नीट धुणे, विशेषतः जेवणाआधी आणि शौचानंतर
नखं स्वच्छ आणि लहान ठेवावीत
शरीरातून बाहेर फेकले जाणारे अपशिष्ट योग्य पद्धतीने टाकावे
लवकरच सण-उत्सव आणि प्रवासाचा हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान खानपान, पाण्याची स्वच्छता आणि व्यक्तिगत स्वच्छतेबाबत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. प्रवासात अचानक जुलाब, उलटीसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.केरळमधील आरोग्य विभागाने जारी केलेल्या चेतावणी नुसार, सतर्कता आणि स्वच्छता हाच एकमेव उपाय आहे. कोरोना आणि हेपेटायटीस अशा दुहेरी संकटांच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे हे अत्यंत गरजेचे आहे.