Mayday म्हणजे काय? (फोटो सौजन्य - iStock)
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान AI-171 कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या विमानात विजय रुपानीसह २४२ प्रवासी होते. हा अपघात झाला तेव्हा हे विमान लंडनला जात होते. DGCA ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की लंडनला उड्डाण केल्यानंतर अहमदाबादमध्ये क्रॅश होण्यापूर्वी काही मिनिटे आधी मेडे कॉल देण्यात आला होता.
परंतु एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळले. आता सामान्य माणसांना हा प्रश्न पडू शकतो की मेडे कॉल म्हणजे नक्की काय आणि हा कॉल उचलण्यात आला असता अथवा प्रतिसाद मिळाला असता तर यामुळे 242 प्रवाशांचा जीव वाचू शकला असता का? जाणून घेऊया महत्त्वाची माहिती (फोटो सौजन्य – X.com)
Mayday कॉल म्हणजे काय?
‘Mayday’ कॉल ही एक आणीबाणीची प्रक्रिया आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावर रेडिओ संप्रेषणाद्वारे गंभीर धोक्याचा संकेत म्हणून वापरली जाते. ती जीवाला धोका निर्माण करणारी आपत्कालीन परिस्थिती दर्शवते. विमान चालवणारे पायलट्स गंभीर परिस्थितीमध्ये ही आणीबाणीची प्रक्रिया वापरतात.
खरंतर, मेडे हा शब्द विमानातील वैमानिक किंवा जहाजाचे कॅप्टन आपत्कालीन परिस्थितीत बोलतात. Mayday हा शब्द डिस्ट्रेस कॉलमध्ये वापरला जातो. पायलट त्यांच्या आपत्कालीन परिस्थितीबद्दल सांगण्यासाठी विमानतळांवर उपस्थित असलेल्या केंद्रांना मेडे कॉल करतात. जेव्हा विमान धोक्यात असते आणि पायलटसह सर्व प्रवाशांचे जीव धोक्यात असतात तेव्हा हा कॉल केला जातो. Mayday कॉलसाठी, सर्वप्रथम पायलट कॉल करताच 3 वेळा मेडे म्हणतो जेणेकरून ऐकणाऱ्या लोकांना कोणताही शब्द चुकीचा समजू नये. त्यानंतर तो त्याची परिस्थिती, समस्या, विमान कुठे आहे, ते कोणते आहे, किती लोक धोक्यात आहेत अशी माहिती देतो.
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद-लंडन विमान क्रॅश झालेच कसे, आतापर्यंत मिळालेली माहिती जाणून घ्या
Mayday कधी सुरू झाला?
1920 मध्ये Mayday सुरू झाला. फ्रेडरिक स्टॅनली मॉकफोर्ड हे लंडनमधील क्रॉयडन विमानतळावर वरिष्ठ रेडिओ अधिकारी होते. त्यांनी प्रथम आपत्कालीन कॉलसाठी या सिग्नलचा वापर केला. त्यांना असा शब्द सुचवण्यास सांगण्यात आले जे पायलट आपत्कालीन कॉलमध्ये वापरू शकेल आणि ग्राउंड स्टाफला त्याच्या परिस्थितीबद्दल सांगू शकेल. त्यावेळी, क्रॉयडन विमानतळावर येणारी बहुतेक विमाने पॅरिसमधील ले बोर्जेट विमानतळाची होती. फ्रेडरिकने “मायडर” या फ्रेंच शब्दाचा वापर करून मेडे हा शब्द तयार केला. फ्रेंचमध्ये मेडे म्हणजे ‘मला मदत करा’ असा अर्थ होतो.
आत्पातकालीन स्थितीत कोणत्या शब्दांचा वापर
याआधी, SOS (Save Our Soul) हा शब्द वापरला जात असे ज्याचा अर्थ होता आपला जीव वाचवा. 1927 मध्ये, आंतरराष्ट्रीय रेडिओ टेलिग्राफ कन्व्हेन्शनने मेडे हा शब्द रेडिओटेलीफोन त्रास कॉल म्हणून निवडला. मेडे व्यतिरिक्त, इतर अनेक शब्द आपात्कालीन परिस्थितीत वापरले जातात. पॅन-पॅन हा देखील एक प्रसिद्ध शब्द आहे. तो फ्रेंच शब्द “पॅन” पासून आला आहे ज्याचा अर्थ एखाद्या गोष्टींमध्ये बिघाड आहे असा होतो.
हा शब्द कठीण परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. हा शब्द यांत्रिक बिघाड किंवा कोणत्याही वैद्यकीय समस्येसाठी वापरला जातो. पॅन-पॅन आणि मेडे मधील फरक असा आहे की पॅन-पॅन कमी तातडीच्या परिस्थितींसाठी वापरला जातो ज्यासाठी त्वरीत कारवाईची आवश्यकता नसते.