Anna Hazare entered the Delhi Assembly Elections 2025 by posting a video
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. संपूर्ण देशाचे लक्ष दिल्लीच्या निवडणुकीकडे लागले आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणे एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दिल्लीच्या राजकारणामध्ये आता सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांची एन्ट्री झाली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होत आहे. आम आदमी पक्षासमोर भाजप व कॉंग्रेसचे तगडे आव्हान असणार आहे. अरविंद केजरीवाल यांचा विजयचा रथ रोखण्यासाठी भाजपने शर्तीचे प्रयत्न केले आहे. केंद्रीय नेत्यांसह स्टार प्रचारकांची फौज भाजपसाठी दिल्लीमध्ये ठाण मांडून बसली आहे. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी देखील जोरदार प्रचार केला असून आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये मतदार कोणाच्या पाठिशी उभे राहणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, दिल्लीकरांना सामाजिक नेते आण्णा हजारे यांनी खास आवाहन केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
दिल्लीत भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारे यांनी आवाज उठवला होता. त्यांच्या या आमरण उपोषणामुळे आण्णा हजारे यांनी देशभरामध्ये लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या या आंदोलनात माजी सनदी अधिकारी असलेले अरविंद केजरीवाल आणि टीम उतरली होती. या आंदोलनानंतर अण्णा हजारे यांच्या मदतीमुळे भाजपाला जशी सत्ता मिळाली तशी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला सत्ता मिळाली. आंदोलनानंतर २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी,योगेंद्र यादव, कुमार विश्वास यांच्या टीमने आम आदमी पक्षाची स्थापना केली होती. साल २०१३ मध्ये या पक्षाची दिल्लीत सत्ता आली. परंतू अरविंद केजरीवाल याने राजकारणात येऊ नये अशी अण्णा हजारे यांची इच्छा होती. परंतू केजरीवाल यांनी त्यांचे काहीही न ऐकता सत्ता मिळविली आणि भाजपाची डोकेदुखी वाढवली. मात्र आता दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आण्णा हजारे यांनी खास व्हिडिओ शेअर केली आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अण्णा हजारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी निवडणुकीपूर्वी दिल्लीकरांना आवाहन केले आहे. अण्णा हजारे यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मतदारांनी स्वच्छ विचारांच्या आणि चरित्राच्या लोकांनाच मत देण्याचा आग्रह आपण करत आहोत. जे सत्याच्या मार्गावर चालले आहेत आणि त्याग करायला तयार असतील, अपमान सहन करायला तयार असतील त्यांनाच मते द्या. जर भारताला वाचवायचे असेल तर बलिदान द्यावे लागेल. मतदान प्रक्रीयेत मी पितोय आणि दुसऱ्यांना पिण्याची सुविधा होईल असा दृष्टीकोन नसायला हवा असेही त्यांनी म्हटले आहे. अण्णा हजारे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अण्णा हजारे यांनी मतदानापूर्वी विचार करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये अण्णा हजारे यांनी सूचक सूचना दिली आहे. मात्र यामुळे आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना मदत होणार की त्यांची डोकेदुखी वाढणार याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाची प्रतिक्रीया आलेली नाही. आप नेते अरविंद केजरीवाल यांची देखील कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.