बंगलूरु : बेंगळुरू येथील एका कॅफेमध्ये स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या स्फोटामध्ये पाच लोक गंभीर जखमी झाले आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कॅफेमधील एका संशयास्पद बॅगेत असणाऱ्या गोष्टीचा स्फोट झाला आहे. कॅफेमध्ये झालेल्या या स्फोटामुळे आसपासच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत योग्य ती खबरदारी घेतली. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत.
बेंगळुरूमधील अत्यंत लोकप्रिय रेस्टॉरंट रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी स्फोट झाला. या स्फोटानंतर कॅफेला आग देखील लागली. या सर्व घटनेमुळे आसपासच्या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाली. दरम्यान एचएएल पोलिसांना तत्काळ याबद्दल माहिती देण्यात आली दरम्यान या स्फोटानंतरचे परिसरातील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. नेमके किती लोक जखमी आहेत याबद्दल माहिती समोर आली नसून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत किमान पाच जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले . हा कॅफे बेंगळुरूमधील सर्वात लोकप्रिय फूड जॉइंट्सपैकी एक आहे. रेस्टॉरंटमध्ये तीन लोक काम करत होते. जेवणासाठी आलेल्या महिलेसह चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र हा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.