
Bihar Assembly Election 2025
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यावद यांच्या आरजेडी पक्षाचा दारूण पराभव झाला. या पराभवाला चोवीस तास उलटत नाहीत तोच त्यांना आता आणखी एक धक्का बसला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी पक्ष आणि कुटुंबाशी संबंध तोडले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही घोषणा केली. रोहिणी आचार्य यांनी पक्ष आणि कुटुंब दोन्ही सोडण्याच्या घोषणेमुळे राजद कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. पण यादव कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याने अद्याप या प्रकरणावर भाष्य केलेले नाही.
लालूंची मुलगी रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. “मी राजकारण सोडत आहे. मी माझ्या कुटुंबाशी संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांनी मला हे करण्यास सांगितले. मी सर्व दोष स्वतःवर घेत आहे.” असं रोहिणी आचार्य यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख नेते आणि राज्यसभा सदस्य संजय यादव तसेच तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय सहकारी रमीज सुलतान हे दोघे गेल्या काही दिवसांपासून पक्षात चर्चेचे केंद्रबिंदू ठरत आहेत. तेजस्वी यादव यांच्या रणनीती, निवडणूक मोहिमा आणि संघटनात्मक निर्णयांमध्ये या दोघांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मानले जाते.
संजय यादव हे तेजस्वी यादव यांचे महत्त्वाचे सल्लागार असून त्यांच्या “इनर सर्कल”मध्ये ते प्रमुख स्थानावर आहेत. तर रमीज सुलतान हे तेजस्वी यादव यांच्या वैयक्तिक सचिवालयात (PSD) कार्यरत असून विशेषतः मुस्लिम मतपेढी व्यवस्थापन, निवडणूक प्रचार आणि रणनीती आखणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. रमीज हा समाजवादी पक्षाच्या माजी खासदाराचा जावई असून तेजस्वीसोबत क्रिकेट खेळताना आणि ‘बिहार अधिकार यात्रा’दरम्यानही तो वारंवार दिसला आहे.
दरम्यान, रोहिणी आचार्य यांच्या वागणुकीमुळे पक्षाला निवडणुकीत नकारात्मक संदेश गेल्याचा आरोप करण्यात येत असून त्यांना या खराब कामगिरीसाठी जबाबदार धरण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कौटुंबिक वाद सार्वजनिक झाल्यानंतर रोहिणी सिंगापूरला गेल्या होत्या. त्यानंतर त्यांना प्रचारासाठी बोलावण्यात आले, पण त्यांना केवळ राघोपुर परिसरातच प्रचार करण्याची मर्यादित परवानगी देण्यात आली. छपरा येथे विविध ठिकाणी भेट देण्याची त्यांची इच्छा असूनही पक्षाने त्यांना ते करण्यास नकार दिला.
मतमोजणीच्या दिवशीही रोहिणी यांनी तेजस्वींना शुभेच्छा संदेश पाठवला, मात्र त्यांना त्याचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संजय यादव हे रोहिणीला तेजस्वींसाठी संभाव्य धोका मानत असल्याचाही आरोप सूत्रांकडून केला जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रोहिणी आचार्य आणि तेजस्वी यादव यांच्यातही मतभेद असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पक्षातील अंतर्गत घडामोडींमुळे RJDच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याचे स्पष्ट होत आहे.