केंद्रातील मोदी सरकारला नितीशकुमार धक्का देणार?
पाटणा : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर दिल्ली, बिहारसह इतरही राज्यांत निवडणुका घेतल्या जाणार आहेत. असे असताना आता केंद्रात सत्तेत असलेल्या नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल (JDU) राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी संधी दिली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नितीश कुमार यांना संधी देणार नाही असा संशय जनता दल युनायटेडच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे नितीश कुमार विधानसभा निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीत परत येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र, बिहारच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीनंतर सत्ता आल्यास नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील. रालोआचे नेतृत्व नितीश कुमारच करतील असे सांगितले आहे. या सर्व चर्चा सुरू असताना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यासाठी राजदचे दरवाजे बंद असल्याचे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय दोन्ही पक्षांच्या बैठकीत केला जाईल, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्राप्रमाणेच भाजप बिहारमध्ये पाऊल उचलेल, अशी चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रात जास्त जागा जिंकल्यानंतर भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. हाच कित्ता बिहारमध्येही लागू केला जाईल, असे म्हटले जात आहे.
नितीशकुमार खरंच भाजपवर नाराज आहेत का?
नितीश कुमार मीडियाशी बोलत नसल्याने ते भाजपवर नाराज असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेव्हा ते गप्प बसतात तेव्हा बिहारमध्ये कुठला तरी राजकीय खेळ रंगतो, असा तेथील जाणकरांचा अंदाज आहे. नितीश कुमार जेव्हा दिल्लीत गेले तेव्हा त्यांनी दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. मात्र, त्यांनी भाजप नेत्यांना भेटणे योग्य मानले नाही.
नितीशकुमारांच्या पाठिंब्याने केंद्रात मोदींचे सरकार
नितीशकुमारांच्या पाठिंब्याने केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर असताना हा प्रकार घडला. आठवडा-दहा दिवसांपूर्वी अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीलाही त्यांनी उपस्थित राहणे टाळले, तर एनडीए सरकारमध्ये नितीश कुमार यांच्यासारखीच भूमिका बजावणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपस्थित होते.