Vice President Election : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार चुरशीची; राज्यात महाविकास आघाडीचे पारडे जड
नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या पदासाठी निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या संख्याबळाचा विचार करता एकूण 68 खासदार आहेत. महाविकास आघाडीकडे लोकसभा आणि राज्यसभेचा विचार करता 38 खासदारांचे बळ आहे. तर महायुतीचा आकडा 30 च्या घरात जातो. त्यामुळे महाविकास आघाडीचे पारडे जड वाटत आहे.
राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या संख्याबळापेक्षा अधिकची मते सी. पी. राधाकृष्णन यांना मिळावीत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत किती खासदार येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात होत असलेली उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
एनडीए आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत बाजी मारली. त्यानंतर इंडिया आघाडीने त्यांच्या विरोधात सुदर्शन रेड्डी यांना संधी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत पहिल्यांदाच दक्षिण विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच महाराष्ट्रातून कोणाला मताधिक्क्य मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
लोकसभा-राज्यसभेचे खासदार करतात मतदान
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करतात. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण 68 मतदार आहेत. पक्षीय बलाबल पाहता कोणाला आघाडी मिळणार याची उत्सुकता कायम होती. धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीची घोषणा झाली. संख्याबळ पाहिल्यानंतर एनडीएने सी. पी. राधाकृष्णन विजयी होतील, असे चित्र वाटत होते. त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीकडून उमेदवार दिला जाणार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल, असे चित्र दिसत होते.
महाविकास आघाडीकडे 38 तर महायुतीकडे…
महाविकास आघाडीकडे ३८ तर महायुतीकडे ३० खासदार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेतील पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसकडे 13, भाजप 9, उद्धव ठाकरे यांची शिवसेना 9, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस 8, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 7, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 1. अपक्ष 1 (काँग्रेस समर्थक) असे महाविकास आघाडी 31, महायुती 17 असे संख्याबळ आहे.