भुवनेश्वर : बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी (Balasore Railway Accident) एफआयआर दाखल झाल्यानंतर सीबीआय तपासाला (CBI Investigation) वेग आला आहे. या अपघातामागे रेल्वेचा निष्काळजीपणा कारणीभूत होता की बाह्य घटकांनी केलेला घातपात याचा तपास सीबीआयद्वारे केला जात आहे.
सीबीआय आतापर्यंत कधी रेल्वे अपघाताची चौकशी केली नव्हती. दरम्यान, कोरोमंडल एक्स्प्रेसला कोणत्या लाईनवर जाण्याचा सिग्नल होता यावरील रहस्य मात्र कायम आहे. प्रारंभिक तपासात सिग्नलमधील बिघाड या अपघातास कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. परंतु, बालासोरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र ही शक्यता नाकारली आहे. कोरमंडल एक्स्प्रेसला मेन लाईनवर जाण्याचा सिग्नल ग्रीन होता परंतु लूप लाईनसाठी नव्हता, असे हा अधिकारी केली.
सिग्नल अॅण्ड कम्युनिकेशन्स विभाग गोत्यात
प्रारंभिक तपास करणाऱ्या समितीत पाच सदस्यांचा समावेश आहे. वरिष्ठ सेक्शन इंजिनियर (सिग्नल अॅण्ड कम्युनिकेशन्स) ए.के. महंता यांचा विभाग या घटनेमुळे गोत्यात आला आहे. बहानगा बाजार स्थानकाच्या अप लूप लाईन (रिव्हर्स कंडिशनमध्ये) पॉइंट क्रमांक 17 एवर सेट करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सीबीआय पथकाने दुसऱ्या दिवशीही दुर्घटना स्थळ, बहानगा रेल्वे स्थानक परिसराची दुसऱ्यांदा पाहणी केली.