सध्याचा कोरोना व्हायरस धोकादायक आहे की नाही? आरोग्य यंत्रणेकडून दिली गेली महत्त्वाची माहिती...
पुणे : कोविड-19 अर्थात कोरोना व्हायरसने यापूर्वी केवळ भारतातच नाहीतर जगभरात थैमान घातले होते. पण, आता या कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट आला असून, यामधील बाधितांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. हा नवा व्हेरियंट आशियाई देशांमध्ये पसरत असून, यामुळे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला काळजी घेण्याची गरज आहे. यापूर्वीची परिस्थिती पाहता आता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
महाराष्ट्रात सध्या एकूण सक्रिय अर्थात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 56 आहे. ज्यामध्ये 44 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. नवीन प्रकरणांमध्ये महाराष्ट्र हा तामिळनाडूपेक्षा पुढे आहे. या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाल्यानंतर मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूमागे इतरही आरोग्याची कारणं सांगितली गेली आहेत. मृतांमध्ये 59 वर्षीय पुरुष कर्करोगाने ग्रस्त होता, तर दुसरी मृत 14 वर्षांची मुलगी होती, जी आरोग्याच्या इतर समस्यांनी ग्रस्त होती. त्यामुळे या बाधित रुग्णांचा फक्त कोरोनामुळे मृत्यू झाला असे सांगण्यात आलेले नाही.
दरम्यान, या नव्या कोरोना व्हेरियंटच्या बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र, पहिल्या कोरोना एवढा धोका हा नव्या व्हेरियंटचा नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. तसेच लहान मुलांच्या आरोग्याची देखील अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
कोरोनाची मोठी लाट नाही
सध्या भारतात कोरोनाची कोणतीही मोठी लाट आलेली नाही, असे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. मात्र, आशियाई देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा झपाट्याने प्रसार होत असल्याने आपण आवश्यक व योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. लसीकरणाचा सल्लाही देण्यात आला आहे.
कोरोना घातक असल्याचे उदाहरण नाही
बाधित रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत. तरीही हा नवा प्रकार यापूर्वीच्या कोरोना व्हायरसपेक्षा घातक असल्याचे एकही उदाहरण आढळून आलेले नाही. मे महिन्यात आतापर्यंत भारतात काहीच प्रकरणे समोर आली आहेत. मुंबईत मृत्यू झालेल्या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु, त्यांचा मृत्यू कोरोनामुळेच झाला हेदेखील स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी मात्र घेण्याची गरज निर्माण झाली आहे.