नवी दिल्ली : भारताच्या १५ व्या राष्ट्रपती (15 Th President Of India) म्हणून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय (Win) झाला. त्यांना एकूण मतांच्या ६४ टक्के, तर ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना ३६ टक्के मते मिळाली. सरन्यायाधीश (Chief Justice) येत्या २५ जुलै रोजी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर निवड झालेल्या मुर्मू या सर्वांत तरुण राष्ट्रपती (Young President)(६४ वर्षे एक महिना आणि आठ दिवस) ठरल्या आहेत. त्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपतीही ठरल्या आहेत. अनेक भाजप विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिल्याने उमेदवारी जाहीर होता. राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी (P.C. Modi) यांनी मुर्मू यांच्या निवडीची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह वरिष्ठ मंत्री आणि एनडीएतील पक्षनेते यांनी मुर्मू यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.
मुर्मू यांना मिळालेल्या मतदानामध्ये विरोधी पक्षांच्या खासदार आणि आमदारांची संख्या लक्षणीय आहे. प्रारंभिक आकडेवारीनुसार किमान १७ खासदार आणि किमान १२५ आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ (Cross Voting) करून मुर्मू यांच्या बाजूने कौल दिला. आसाम, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील आमदारांची संख्या सर्वांत जास्त होती. आसाममधील २२, मध्य प्रदेशातील २० आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून मुर्मू यांच्या पारड्यात मत टाकले. बिहार आणि छत्तीसगडमधील विरोधी पक्षांच्या प्रत्येकी चार, गोव्यातील चार आणि गुजरातमधील दहा आमदारांनीही मुर्मू यांना मते दिली. आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि विरोधी तेलुगु देशमच्या सर्व आमदारांनी मुर्मू यांना मतदान केले. दुसरीकडे यशवंत सिन्हा यांना केरळमधील सर्व आमदारांची मते मिळाली.