
Cyclone Montha : उत्तर प्रदेशसह बिहारमध्ये मुसळधार पाऊस; आंध्र प्रदेशात तिघांचा मृत्यू तर पिकांना मोठा फटका
नवी दिल्ली : मोंथा चक्रीवादळाचा फटका केवळ आंध्र प्रदेश, बिहार राज्यांना नाहीतर आसपासच्या राज्यांनाही बसत आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशामध्ये चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेशात तीन जणांचा मृत्यू झाला. 42 गुरे मृत्युमुखी पडली आणि सुमारे १.५ लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले.
मोंथा चक्रीवादळामुळे वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. तेलंगणाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. सूर्यपेटमध्ये झाड कोसळल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. खम्मम जिल्ह्यात एका ट्रक चालकाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मोंथाचा प्रभाव उत्तर भारतातील राज्यांमध्ये जाणवला. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही पाऊस सुरूच असल्याचे दिसून आले. गुरुवारी अयोध्या, लखनऊ आणि कानपूरसह उत्तर प्रदेशातील १५ शहरांमध्ये पाऊस पडला. पावसामुळे काशी जलमय झाले.
याशिवाय, मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला. भोपाळ, इंदूर आणि उज्जैन येथेही जोरदार वारे वाहत होते. गुरुवारी सकाळी जयपूर, अलवर आणि करौलीसह राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. यामुळे तापमानातही घट झाली.
हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट
हवामान विभागाने वारंगल, हनुमानकोंडा, महाबूबाबाद, जनगाव, सिद्दीपेट आणि यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही जिल्ह्यांमध्ये ४०-५० किमी प्रतितास वेगाने वादळ आणि वारे येऊ शकतात.
चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस
चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस पडला. पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जिल्ह्यांमध्ये वारंगल, जनगाव, हनुमानकोंडा, महाबूबाबाद, करीमनगर, सिद्दीपेट, यदाद्री भुवनगिरी, सूर्यपेट, नलगोंडा, खम्मम, भद्राद्री कोठागुडेम, नगरकुरनूल, पेद्दापल्ली आणि हैदराबाद हे होते.
नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, भूस्खलनाचा इशारा
नेपाळमध्ये चक्रीवादळ मोंथा सतत पाऊस आणि बर्फवृष्टी करत आहे. नेपाळ हवामान खात्याने 26 जिल्ह्यांमध्ये पूर आणि भूस्खलनाचा इशारा जारी केला आहे. कोशी, मधेश आणि बागमती प्रांतातील नद्यांच्या पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. विभागाने लोकांना सतर्क राहण्याचे आणि नदीकाठच्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
हेदेखील वाचा : Cyclone Montha : मोंथा चक्रीवादळाचा देशातील अनेक राज्यांना फटका; 1.5 लाख एकरवरील पिके नष्ट