दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारापूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी झालेल्या या कारवाईमुळे इंडिया आघाडीला धक्का बसला. मात्र निवडणूकीचा प्रचार चालू असतानाच सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला. आता अरविंद केजरीवाल यांचा जामीनचा कार्यकाळ संपत आल्याने हालचालींना वेग आला आहे. अरविंद केजरीवाल यांनी तिहार जेलमध्ये ज्यापूर्वी पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा वाजवला आहे.
अंतरिम जामीन संपणार
अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला होता. दिल्ली कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. 21 मार्च रोजी त्यांना अटक झाली. त्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्टाकडून 10 मे रोजी अंतरिम जामीन देण्यात आला. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी हा जामीन देण्यात आल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना पुन्हा तिहार जेलमध्ये जावे लागणार आहे. त्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी जामिनासाठी राऊस एव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राऊस ॲव्हेन्यू कोर्टात सुनावणी
दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी तब्येत ठीक नसल्याच्या कारणावरुन जामीन वाढवल्याची याचिका केली होती. सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना उन्हाळाच्या सुट्टीकालीन पीठाने जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी जामिनासाठी राऊस एव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या याचिकेवर राऊस ॲव्हेन्यू कोर्टात दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीमध्ये निकाल कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालामुळे अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा तिहार जेलमध्ये जावे लागणार का नाही हे लक्षात येणार आहे.